ओढे-नाल्यांचे प्रवाह मोकळे झाले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:25+5:302021-08-01T04:21:25+5:30
अहमदनगर : शहरातील ओढे-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्यात आले आहेत का? याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा ...
अहमदनगर : शहरातील ओढे-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्यात आले आहेत का? याबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्याबाबत अद्यापही कार्यवाही झालीच नसल्याने महापालिका आता काय उत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.
अहमदनगर शहरातील २१ पैकी १४ ओढे-नाले गायब झाले आहेत. या ओढ्या-नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करावेत, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने चंगेडे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याबाबत महापालिकेला आदेश दिला होता. त्यावरही कार्यवाही झाली नसल्याने ही बाब चंगेडे यांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यासोबत त्यांनी वृत्तपत्रांची कात्रणेही सोबत जोडली होती. आता त्यावर निचित यांनी आयुक्तांना आदेश दिला आहे. चंगेडे यांच्या पत्रानुसार कार्यवाहीबाबत त्यांना कळविण्यात यावे. तसेच कार्यवाहीचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणालाही सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
---------
नगर शहरातील ओढ्या-नाल्यांची २५ जुलै २०१९ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती. २१ पैकी १४ नाले गायब आहेत. नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे करण्यात आल्याने ओढ्या-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत, असे त्या पाहणीत आढळून आले होते. सदर नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करावेत आणि कार्यवाहीबाबत सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही, याचा खेद वाटतो.
- शशिकांत चंगेडे, माहिती अधिकार कार्यकर्ते