आशा सेविकेला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. १) सकाळी दहाच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील बोरबन गावात घडली. याप्रकरणी एकाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत अशोक गाडेकर (रा. बोरबन, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशासेविका कुसुम दत्तात्रय गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरबन गावात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अंतर्गत आरोग्य सर्वेक्षण सुरू होते. ग्रामसेवकांच्या आदेशाने आशासेविका कुसुम गाडेकर या सर्वेक्षणात काम करत असताना त्यांनी भारत गाडेकर याच्या पत्नीला मास्क लावा, असे सांगितले होते. याचा राग आल्याने त्याने आशासेविका गाडेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांचे पती दत्तात्रय गाडेकर हे त्यांना मारहाणीतून सोडविण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही. खेडकर अधिक तपास करीत आहेत.