आशुतोष काळे यांनी घेतले विक्रमी मताधिक्य
By सचिन धर्मापुरीकर | Published: November 23, 2024 06:50 PM2024-11-23T18:50:26+5:302024-11-23T18:50:35+5:30
शरद पवारांनी घेतलेल्या सभेचाही फारसा प्रभाव दिसून आला नाही.
कोपरगाव (जि. अहिल्यानगर) : राज्यात विक्रमी मताधिक्य घेणाऱ्या उमेदवारांमध्ये कोपरगाव विधानसभेतून निवडून आलेले आशुतोष काळे यांचे नाव निश्चित असणार आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल एक लाख २४ हजार ६२४ मतांनी पराभव केला. आशुतोष काळे यांना १,६०,०४२ मते मिळाली तर संदीप वर्पे यांना ३६,२०४ मते मिळाली. टपाली मतांमध्येही ७८६ मते घेत काळे आघाडीवर राहिले.
निवडणुकीत पारंपरिक विरोधक कोल्हे आपल्या समोर असतील, ही खूणगाठ बांधून गेली पाच वर्षे आशुतोष काळे यांनी विकासकामे केली, कार्यकर्ते जोडले. परंतु पक्षादेशानंतर विवेक कोल्हे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. कोल्हे कोणती भूमिका घेतील, याकडे मतदारसंघाचे लक्ष होते. परंतु त्यांनी महायुतीचा धर्म पाळल्याचे आ. काळे यांच्या मताधिक्यावरून दिसून येते. माजी आ. स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे कुणीही काळे यांच्या स्टेजवर दिसले नाहीत, परंतु त्यांनी कार्यकर्त्यांकरवी इमानेइतबारे काळेंना साथ दिल्याचे सिद्ध होते.
केलेली विकासकामे, प्रभावी प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांची भक्कम फळी, माजी आमदार अशोकराव काळे यांचे नियोजन व आई पुष्पाताई आणि पत्नी चैताली काळे यांनी घेतलेल्या कॉर्नर सभा. तुलनेत विरोधी उमेदवार संदीप वर्पे कमी पडले. शरद पवारांनी घेतलेल्या सभेचाही फारसा प्रभाव दिसून आला नाही.