अकोले : तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कुमशेतला जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, केवळ दगडधोंड्याची ओबडधोबड गाडीवाट शिल्लक आहे. एकेकाळी येथे डांबरी सडक होती ? असे म्हणण्याचे धाडस सध्या तरी कुणी करणार नाही. रस्ता आहे की, दगडधोंड्यांचा मार्ग असा प्रश्न सर्वांनाचा पडत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ऐरणीवर आहे.
निसर्गाचे लेणे लाभलेले, मुळा नदीचे उगमस्थान, रामायणातील आजोबा गड पायथ्याला व आदिवासी समाजाचं श्रध्दास्थान 'धारेराव' च्या प्रांगणात वसलेलं कुमशेत हे टुमदार आदिवासी खेडेगाव. कृषी व वन विभागाच्या मदतीने गाव चार - पाच वर्षांपूर्वी जलसमृद्ध झाले. जलयुक्त शिवारचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
तीन-चार वर्षांपासून या गावच्या रस्त्याची दुरवस्था झाली. रस्ता होत्याचा नव्हता झाला. शिरपुंजे - अंबित दरम्यान असलेल्या वाघ्या फाट्यापासून या गावाला स्वतंत्र रस्ता फुटतो. वाघ्या ते कोकतरे वस्तीपर्यंत केवळ ९०० मीटरचा रस्ता काँक्रीटीकरण झाला. जायनावाडीपासून पुढे कुमशेत गावठ्यापर्यंत ९ - १० किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जंगल रानातून केवळ खडीचा गाडीरस्ता उरला आहे. काही ठिकाणी रस्ताच दिसत नाही. तरीदेखील मुक्कामी एस. टी. बसची सुविधा येथे सुरू आहे.
मागील आमदारांनी या रस्त्याकडे लक्ष दिले नाही आणि विद्यमान आमदार यांना कोरोनामुळे या रस्त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त व्हावा, ही गावकऱ्यांची मागणी आहे. रस्ता दुरुस्त झाला तर कुमशेत परिसरातील पर्यटन विकासास चालना मिळेल, अशी आशा आहे.
......
केवळ ९०० मीटरचा रस्ता झाला आहे. रस्ता दुरुस्ती मागणीचा तगादा दोन - तीन वर्षांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत हा रस्ता असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. २० दिवसांपूर्वी आमदार डॉ. किरण लहामटे 'धारेराव'ला मुक्कामी होते. रस्त्याची अवस्था त्यांनी पाहिली आहे. आता रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. गावात आरोग्याची सुविधा नाही, तीन - चार वर्षांपासून गावात आरोग्य उपकेंद्र व्हावे, ही गावकऱ्यांची मागणी आहे.
- सयाजी अस्वले, सरपंच, कुमशेत
.................
मुळाखोऱ्यातील हरिश्चंद्रगड, पाचनई, कुमशेत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली. रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. कुमशेत रस्त्यावरील जायनावाडी ते हेंगावाडी असा तीन किलोमीटरचा रस्ता तातडीने प्रस्तावित आहे. पुढे सात किलोमीटरच्या रस्त्यासाठी निधीची तरतूद करणार आहे.
- डॉ. किरण लहामटे, आमदार