नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सात दिवसांच्या आत मदत, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
By अरुण वाघमोडे | Published: April 11, 2023 03:28 PM2023-04-11T15:28:04+5:302023-04-11T15:28:31+5:30
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वनकुटे परिसरात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
अहमदनगर: पारनेर तालुक्यातील वनकुटे परिसरात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल. अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझड झालेल्या २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तत्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायघुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानीची पहाणी करून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.