सत्ताधाऱ्यांनी बंदिस्त नाट्यगृहाचा निधी दुसरीकडे पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:20 AM2021-03-27T04:20:37+5:302021-03-27T04:20:37+5:30
कोपरगाव : मतदार संघाचा विकास करीत असल्याच्या फक्त वल्गना करणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी संगनमत करून नाट्यगृहाचा ...
कोपरगाव : मतदार संघाचा विकास करीत असल्याच्या फक्त वल्गना करणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी संगनमत करून नाट्यगृहाचा निधी दुसरीकडे पळविला आहे. यामुळे कोपरगावकरांना नाट्यगृहापासून वंचित ठेवण्याचे काम त्यांनी केले असल्याची टीका भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मोठी नगरपरिषद असलेल्या कोपरगाव शहरातील कलात्मक व सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी आधुनिक नाट्यगृह उभारणीच्या दृष्टीने सुमारे ८ कोटी रूपयांचा निधी मिळावा म्हणून २० मार्च २०१५ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी केली होती, त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार २०१७ - २०१८ या वर्षात २ कोटी रूपयांचा निधी कोपरगाव नगरपरिषदेला वितरित करण्यात आला. इरिगेशन बंगल्याजवळील पाटबंधारे विभागाची जागाही या नाट्यगृहासाठी एक एकर जागा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शहरात नाट्यगृह बांधण्याकरिता हस्तांतरित करणे व करारनामा करून घेणेबाबत उपविभागीय अभियंता, गोदावरी डावा तट कालवा, उपविभागाने कोपरगाव नगरपरिषदेस कळविले होते. वास्तविक अथक परिश्रम करून आपण बंदिस्त नाट्यगृहासाठी निधी मंजूर करून आणला. जागाही उपलब्ध करून दिली. फक्त जागा ताब्यात घेऊन काम सुरू करणे बाकी असताना सदरचा निधी अन्यत्र वळवून बिले काढण्यासाठीचाच सत्ताधाऱ्यांनी हा खटाटोप केला असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे.