अहमदनगर: महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.
स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर सचिव एचडी तडवी यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला.
अविनाश घुले यांच्या एका अर्जाला बसपाचे मुदस्सर शेख हे सूचक आहेत, तर अनुमोदक राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे हे आहेत. दुसऱ्या उमेदवारी अर्जाला राष्ट्रवादीचे सागर बोरुडे हे सूचक असून काँग्रेसच्या सुप्रिया जाधव या अनुमोदक आहेत.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे वाकळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, गणेश भोसले, बसपाचे मुदस्सर शेख, सचिन जाधव, निखिल वारे, विनीत पाऊलबुध्दे, बाळासाहेब पवार, रवी बारस्कर आदी उपस्थित होते.