भुजबळांच्या अटकेचा नगरमध्ये निषेध
By Admin | Published: March 16, 2016 08:29 AM2016-03-16T08:29:04+5:302016-03-16T08:29:11+5:30
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे तीव्र पडसाद मंगळवारी नगर शहरासह जिल्ह्यात उमटले़
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अटकेचे तीव्र पडसाद मंगळवारी नगर शहरासह जिल्ह्यात उमटले़ जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, नेवासा, श्रीगोंदा, जामखेड, राहता, अकोले तहसील कार्यालयांवर समता परिषद व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मोर्चे काढून भुजबळ यांच्या अटकेचा निषेध केला़ संगमनेर येथे कार्यकर्ते व अधिकाऱ्यांत शाब्दीक चकमक उडाली़
माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार छगन भुजबळ यांच्यावर सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली उबेद शेख, संजय झिंजे, किसन लोटके, राधेशाम धूत आदी पदाधिकारी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले़ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, महापालिका सभागृह नेते कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे, बाबासाहेब गाडळकर, विकी जगताप आदी पदाधिकाऱ्यांनीही शहरातून मोर्चा काढून भुजबळ यांच्या अटकेचा निषेध केला़
भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आक्रमक झाले़ त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुतळ्याचे शिवाजी पुतळ्यासमोर प्रतिकात्मक दहन केले़ दत्ता जाधव, संजय दळवी, प्रसाद भडके, विनायक नेवसे, सचिन गुलदगड, रोहन डागवाले, निखिल शेलार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते़ यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ याशिवाय जिल्ह्यातील तालुकास्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी मोर्चे व आंदोलने करण्यात आली़ कारवाई मागे न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला.