जयंती विशेष : छत्रपती संभाजी महाराजांमुळे बहादूरगडाची इतिहासात नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 11:44 AM2019-05-14T11:44:57+5:302019-05-14T11:45:08+5:30
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि कणखर बाण्याने पेडगाव (ता. श्रीगोेंदा) येथील बहादूरगडाची इतिहासात नोंद झाली.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि कणखर बाण्याने पेडगाव (ता. श्रीगोेंदा) येथील बहादूरगडाची इतिहासात नोंद झाली. त्यामुळे बहादूरगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, प्रेरणा, स्वाभिमानी विचाराचा ध्वज अभिमानाने फडकत आहे. मंगळवारी (दि.१४) छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असून त्यानिमित्त बहादूरगडावरील त्यांच्या आठवणी जाग्या करण्याचा हा प्रयत्न आहे.
पेडगावचा किल्ला हा यादवकालीन आहे. ही कुबेरांची पुरातन राजधानी होती . निजामशहाने हा गड ताब्यात घेतला. या गडाच्या नियोजनाची सूत्रे मालोजीराजे व शहाजीराजे भोसले यांच्याकडे दिली. औरंगजेबाने निजामशाहीचा प्रांत ताब्यात घेतला आणि पेडगावचा यादवकालीन गडही ताब्यात घेतला. बहादूरखानाच्या ताब्यात दिला. बहादूरखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मधाचे बोट करून ताब्यात घेतले. बहादूरखान वेडा दिवाना निघाला. त्यावर औरंगजेब संतप्त झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा फितूर सरदार गणोजी शिर्के याच्याशी सलगी करून छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी कट केला.
छत्रपती संभाजी महाराज कोकणातील संगमेश्वरवरून रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडले आणि पेडगाव गडावर आणले. औरंगजेब यांच्यासमोर हजर केले औरंगजेब याने छत्रपती संभाजी महाराजांकडे स्वराज्याची मागणी केली. आपला मौल्यवान खजिना कुठे आहे?
आपणास कोणते मुस्लिम सरदार फितूर आहेत हे प्रश्न विचारले. छत्रपती संभाजी महाराजांनी एकाही प्रश्नाचे औरंगजेबला उत्तर दिले नाही. हर हर महादेव आणि स्वराज्याच्या घोषणा दिल्या. स्वराज्य व धर्म निष्ठा दाखविली. त्यामुळे औरंगजेब चिडला. त्याने छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय वाईट वागणूक दिली.
त्यानंतर पेडगावच्या बहादूरगडास महत्त्व आले. पेडगावगडावर राणीचा महाल असून भैरवनाथ, मल्लिकार्जुन, बालेश्वर, रामेश्वर, लक्ष्मी नारायण ही मंदिरे आहेत.
पेडगावच्या ५२ पेठा, लक्ष्मी नारायण व भैरवनाथ मंदिरात असलेले भगवान महावीर यांचे शिल्प, हत्ती मोट, खापरी पाईपलाईन येथील समृद्धीचे भक्कम पुरावे आहेत. बहादूरगडाची दुरवस्था झाली आहे. गडप्रेमी आणि शिवप्रेमींच्या सहभागातून अनेक उपक्रम या गडावर राबविले आहेत. तसेच भारतीय पुरातत्व विभागाने बालेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे.
बहादूरगडाच्या भूमीचे आता रेकॉर्ड..
बहादूरगडाचे ११० एकर जागेचे रेकॉर्डच महसूल विभागाकडे निघत नव्हते. श्रीगोंदा येथील प्राचीन वास्तू शिल्प यांचे अभ्यासक प्रा. नारायण गवळी यांनी यासाठी खूप पाठपुरावा केला. तहसीलदार महेंद्र महाजन यांनी भूमी अभिलेख विभागाला रेकॉर्ड तयार केले नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करेल, अशी नोटीस बजावली. त्यानंतर मोजणी करून बहादूरगडाचा ११० एकर जागेचा सात बारा उतारा तयार करण्यात आला. गडाचे रेकॉर्ड तयार झाल्याने राज्य पर्यटन विकास महामंडळाला बहादूरगडातील मंदिराचा जीर्णोद्धार, पथदिवे, भीमानदी घाट तयार करणे आदी कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.