अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली आहे. राष्टÑवादी व बसपा यांच्या पाठिंब्यावर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. सेनेला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. सकाळी 11 वाजता महापौर निवडीची सभा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. शिवसेनेच्या 24 नगरसेवकांपैकी 23 नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांना सेनेला पाठींबा दिला. सेनेला एकूण 08 मते मिळाली राष्ट्रवादीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बारस्कर, अविनाश घुले, नज्जू पहिलावान हे नगरसेवक भाजपचे महापौर पदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबतच महापालिकेत आले. त्याचवेळी राष्टÑवादी व भाजप सोबत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. सभागृहात महापौर पदासाठी राष्टÑवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे असे दोन उमेदवार रिंगणात होते. वाकळे यांना 37 इतकी मते मिळाली. त्यात भाजपचे 14, राष्टÑवादीची 18, बसपा 04 अपक्ष 01 अशा मतांचा समावेश आहे. सेनेचे बोराटे यांना 08 इतकी मते मिळाली. श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे. सेनेला स्वत:चे 07 व छिंदमचे 01 असे 08 मते मिळाल्याचे पिठासीन अधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जाहीर केले.
नगर निवडणूकः भाजपा-राष्ट्रवादीच्या 'खेळी'नं शिवसेनेचा 'खेळ खल्लास'; भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 11:40 AM