अठरा वर्षांवरील नागरिकांचे बूथनिहाय लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:22+5:302021-05-05T04:33:22+5:30
कोपरगाव : राज्य शासनाने कोरोना नियंत्रणासाठी १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात ...
कोपरगाव : राज्य शासनाने कोरोना नियंत्रणासाठी १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात केली आहे. मात्र, हे लसीकरण कोपरगाव शहरात ग्रामीण रुग्णालयात फक्त एकाच ठिकाणी असल्याने गर्दी होऊन येथे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना पोलिओच्या लसीकरणाप्रमाणे बूथनिहाय लसीकरण करावे, जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. अशी मागणी कोपरगाव येथील मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देत केली आहे.
आढाव म्हणाले, मार्च महिन्यापासून कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या देखील दिवसागणिक वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा दिवसरात्र कष्ट घेत आहेत. त्यामुळे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात तणाव सहन करावा लागत आहे. तसेच ३ एप्रिलपासून सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. एवढे करूनही रुग्णवाढ नियंत्रणात येत नसल्याने कोपरगाव शहरात ८ मेपर्यंत जनता कर्फ्यू करण्यात आला आहे. मात्र, लसीकरणासाठी या वयोगटातील नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन यातून पुन्हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत कोपरगाव शहरात बूथनिहाय लसीकरण केंद्र उभारून नागरिकांना लसीकरण करावे. त्यामुळे ज्या त्या प्रभागातील नागरिकांचे लसीकरण होऊन होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल. तसेच गर्दी होऊ नये यासाठी त्यात्या परिसरातील कोरोना नियंत्रण समिती, सामाजिक कार्यकर्ते देखील आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मदत करू शकतात.