राहाता / संगमनेर (जि. अहमदनगर) : गणेश विसर्जनावेळी पाण्यात पडलेल्या दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राहाता व संगमनेर तालुक्यात घडली.राहाता तालुक्यातील पिंपळस येथे घरघुती गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी गेलेला तरुण सागर रमेश कदम (वय २४) याचा पाय घसरुन तो तळ्यात पडला. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिंपळस शिवारात घडली. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडू लागला. त्याचवेळी त्याच्यासोबत असणाऱ्या लहान मुलाने आरडाओरडा केल्याने जवळच असणा-या महिला धावत आल्या. त्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सुमारे तासानंतर काही तरुणांनी येऊन सागरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.संगमनेर शहरातील अमृतनगर येथे राहणारा नीरज चंदूलाल जाधव (वय २८) हा कुटूंबासमवेत प्रवरा नदीवर घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. मात्र, वाळूसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. सोमवारी सकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती. तब्बल अठरा तासांनी सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास या तरूणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अवैध वाळू वाहतुकीने प्रवरा नदीपात्रात झालेल्या मोठ्या खड्ड्यांमुळेच तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 2:13 PM