अहमदनगरमध्ये सहकारी बँकेची शाखा फोडली, सायरन वाजल्यामुळे लुटण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:27 AM2018-03-23T10:27:58+5:302018-03-23T10:58:39+5:30
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यातील वाळकी येथील शाखा पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. मात्र बँकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला.
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची नगर तालुक्यातील वाळकी येथील शाखा पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. मात्र बँकेतील सायरन वाजल्यामुळे तिजोरी लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
शनिवारी पहाटे चोरट्यांनी बँकेच्या मुख्य दरवाजाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये चोरट्यांनी कागदांची उचकापाचक सुरु केली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा तिजोरीकडे वळविला. तिजोरी फोडायला गेले असताच सायरन वाजू लागला त्यामुळे चोरट्यांनी बँकेतून धूम ठोकली.
तत्पुर्वी बँकेच्या वरच्या मजल्यावरील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कार्यालय फोडले. मात्र तेथे चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी बँकेच्या बाजूच्याच दोन टप-या फोडल्या. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळी श्वान पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे. नगर तालुका पोलीस निरीक्षक किशोर परदेशी, सहायक निरीक्षक महेश क्षीरसागर, अनंत सत्रे हे घटनेचा तपास करत आहेत.