वीटभट्टी कामगार निघाले मोबाईल चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:27+5:302021-07-17T04:17:27+5:30
कर्जत : कुळधरण (ता. कर्जत) येथील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात कर्जत पाेलिसांना अवघ्या पाच दिवसात यश आले. येथील वीटभट्टी ...
कर्जत : कुळधरण (ता. कर्जत) येथील मोबाईल चोरीचा छडा लावण्यात कर्जत पाेलिसांना अवघ्या पाच दिवसात यश आले. येथील वीटभट्टी कामगारांनीच दुकान फोडून पाच लाख रुपयांचे २६ मोबाईल चाेरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख रुपयांचे २१ मोबाईल जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
कुळधरण येथे ११ जुलैच्या रात्री प्रमोद चव्हाण यांची मोबाईल शाॅपी फोडून पाच लाख रुपयांच्या २६ मोबाईलची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने तपास मोहीम राबविली. याचदरम्यान पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार मोबाईल शॉपीच्या चोरीच्या संशयाची सुई चिलवडी गावच्या शिवारात वीटभट्टीवर काम करत असलेल्या कामगारांकडे गेली. तत्काळ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी तेथे जाऊन सापळा लावला. यावेळी पप्पू सर्जेराव गायकवाड (वय २५, रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड), सूरज बाळू गायकवाड (वय २०, रा. बेनवडी, ता. कर्जत) यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली. त्यांनी गुन्हा कबूल केल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. त्याने इतर दोघांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी खडकी (ता.करमाळा, जि.सोलापूर) येथे जाऊन विकास कैलास घोलवड यास ताब्यात घेतले. पकडलेल्या तिघांकडून गुन्ह्यातील चोरी केलेली ४ लाख २० हजार रुपये किमतीचे एकूण २१ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सुनील माळशिखरे, भाऊसाहेब मगर, विकास चंदन करीत आहेत.