बोधेगावातील काळा ओढ्यावरचा पूल उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:29+5:302021-02-14T04:19:29+5:30
शेवगाव-गेवराई मार्गावरील बोधेगाव येथील मारोती वस्ती नजीकचा काळा ओढ्यावरचा पूल ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीपासून ते आजतागायत चार महिने ...
शेवगाव-गेवराई मार्गावरील बोधेगाव येथील मारोती वस्ती नजीकचा काळा ओढ्यावरचा पूल ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीपासून ते आजतागायत चार महिने उलटले तरी फुफाट्यातच लोळत आहे. संबंधित प्रशासन केवळ तात्पुरती मुरूम, मातीची मलमपट्टी करून नामानिराळे झाले. प्रशासनाने जवळपास दोन महिने पूल पाण्याखाली असताना शेजारील बंधाऱ्याकडे बोट दाखवत पाणी कमी होण्याची वाट बघत दिवस ढकलले. तर सद्यस्थितीला दोन महिन्यांपासून पूल कोरडाठाक असताना ठोस दुरूस्ती केली जात नाही. यामुळे पूल अधिकच उखडला जाऊन उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे दिवसाढवळ्या याठिकाणी अपघात होत आहेत. शुक्रवारी (दि.१२) बालमटाकळी येथील अनिता दादासाहेब सोनवणे (वय ३३) ही महिला येथील खड्ड्यात दुचाकी जोरात आदळल्याने गाडीवरून पडून जखमी झाली. यापूर्वी बोधेगाव येथील सागर लाड, माळेगाव येथील वयोवृद्ध महिला तसेच बाहेरगावचे अनेक अनोळखी प्रवाशी याठिकाणी कोसळून गंभीर जखमी झाले. प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर कानाडोळा करत आहे. केदारेश्वर, ज्ञानेश्वर, गंगामाई, वृध्देश्वर, मुळा, मराठवाड्यातील जय भवानी, समर्थ आदी साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या पूल ओलांडताना नाकीनऊ येतात. तर कधी वाहने बंद पडून वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येते. प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच शेवगाव-गेवराई मार्गावरील खड्डे दुरूस्तीचे काम केले. परंतु महिनाभराच्या आतच या मार्गावरील खड्ड्यांची अवस्था जैसे-थे झाली आहे.
...
बोधेगाव येथील काळा ओढ्यावरील पूल दुरूस्तीसाठी आमच्या पातळीवर काहीही प्रावधान नाही. परंतु वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून त्याबाबत प्रयत्न करु. शेवगाव-गेवराई मार्गावरील बोधेगाव बाजारपेठेसह सर्वच खड्डे परत दुरूस्ती करून घेण्यात येतील.
-अंकुश पालवे, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेवगाव.
...
फोटो -१३बोधेगाव पूल१
..
ओळी- शेवगाव-गेवराई मार्गावरील खड्डे दुरूस्ती केलेल्या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.