बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथे भगवानबाबा ग्रामविकास मंडळाच्या वतीने मागील चार महिन्यांपासून सुरू असलेल्या चारा छावणीचा सोमवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. यावेळी छावणीतील पशुपालक शेतक-यांनी छावणीचालकांना टोपी-उपरणेसह नवीन कपड्यांचा आहेर भेट देऊन माणुसकीचे दर्शन घडवले.राणेगाव (ता.शेवगाव) येथे भगवानबाबा ग्रामविकास मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या छावणीत पंचक्रोशीतील आधोडी, सूळेपिंपळगाव, बोधेगाव, चेडेचांदगाव, दिवटे या गावातील लहान मोठ्या ४५० जनावरांची चारापाण्याची चांगली सोय लागली होती. दुष्काळात या चाराछावणीमुळे आमची मुकी जितराबं खाटकाच्या दावणीला जाण्यापासून वाचली तसेच छावणी चालवणा-यांनी जनावरांची चा-यासाठी आबाळ होऊ दिली नाही या परोपकारातून उतराई म्हणून छावणीचालक गणेश उगले, सचिन वाघ, माणिक गर्जे यांना टोपी-उपरण्यांसह औक्षण करत कपड्यांचा आहेर भेट दिल्याचे शेतकरी मधुकर पोटभरे, बबन राठोड, भगवान तिडके, अर्जुनराव देशमुख, महादेव खेडकर, बाळासाहेब बिबे, प्रकाश भुसारी, सुरेश माळी यांनी सांगितले.यावेळी सुदाम पोटभरे, कचरू माळी, विष्णू तिडके, रमेश राठोड, अशोक खंडागळे आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
माणुसकीची छावणी : राणेगाव येथे छावणीचालकांना कपड्यांचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:43 PM