निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील पती-पत्नी जळीत प्रकरणी रूक्मिणीच्या भावंडांसह गावातीलच इतर पाच जणांचा गुरुवारी (दि.९) पारनेर न्यायालयात जबाब नोंदविण्यात आला.निघोज येथील प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक मनिष कलवानिया यांच्याकडे देण्यात आला आहे. पारनेर व निघोज पोलीस तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी निघोज येथे पूर्णवेळ थांबून तपास करीत आहेत.दि. १ मे रोजी मंगेश रणसिंग व रूक्मिणी रणसिंग यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये रूक्मिणी रणसिंग हिचा मृत्यू झाला तर मंगेश रणसिंग हा ४० टक्क्यांपेक्षा जास्त भाजला आहे. मंगेश याने दिलेल्या फिर्यादीवरून रुक्मिणीचे वडील, काका व मामा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत रुक्मिणी हिचा मृत्युपूर्व जबाब सुद्धा वडील, मामा व काका यांच्याविरोधात असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत या तिघांना ताब्यात घेतले. काका सुरेंद्रकुमार भरतिया व मामा घनशाम राणेंज यांना दि. १० मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.याबाबत त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात त्यांच्या विरोधात काय पुरावे आहेत यावरून त्यांची कोठडी वाढणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार? याचा निर्णय दि.१० रोजी होणार आहे. रूक्मिणीच्या भावंडांनी मंगेश यानेच पेट्रोल आणून रूक्मिणीला पेटविल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.तसेच मंगेश यानेच पेट्रोल आणल्याचे पुरावे पोलिसांच्याही हाती मिळाल्याचे समजते. त्यामुळे या गुन्ह्याला वेगळेच वळण मिळाले आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करीत आहेत. याबाबत गुरुवारी दिवसभर निघोज येथे थांबून पोलीस भरतिया व रणसिंग कुटुंबाच्या जवळ राहणाऱ्या लोकांचे जबाब घेत आहेत. तसेच पारनेर न्यायालयात रूक्मिणीच्या भावंडांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे.
‘त्या’ सैराट प्रकरणी : पाच जणांचे नोंदविले जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:38 AM