कोरोनाची साखळी तोडण्याचे मनपासमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:37+5:302021-04-05T04:18:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : गेल्या दहा दिवसात शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून, दररोज चारशे ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : गेल्या दहा दिवसात शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून, दररोज चारशे ते पाचशे नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्याबरोबरच कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे नगर शहरात आहेत. शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाविरोधात महापालिकेची प्रशासकीय यंत्रणाही मैदानात उतरली आहे. कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील किमान १० ते १५ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी शंभर कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ५३७ जणांचा शोध घेऊन त्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. महापालिकची शहरात सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रात लसीकरणाबरोबरच चाचण्यांचे कामही सुरू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. इतर विभागातील कर्मचारी आरोग्य विभागाच्या मदतीला देण्यात आले आहेत. परंतु, तरीही मनुष्यबळ कमी पडत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याची प्रक्रिया महापालिकेने हाती घेतली असून, आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटरची संख्याही वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
.....
दररोज १००० चाचण्या
महापालिकेच्या सात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सध्या ५०० ॲन्टिजेन कीटव्दारे चाचण्या करण्यात येत असून, ५०० स्वॅबचे नमुने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहेत. दररोज एक हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे.
....
१५०० बेडची व्यवस्था
महापालिकेकडून आत्तापर्यंत ६०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णसंख्या वाढणार आहे. त्यामुळे बेडची आवश्यकता भासणार आहे. पुढील काही दिवसात बेडची संख्या वाढवून दीड हजार केली जाणार असल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले.
....
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ७३ वसुली लिपिक
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिेकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला आहे. त्यासाठी वसुली विभागातील ७३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील किमान २० जणांचा शोध घेतला जात आहे.
....
गर्दी रोखण्यासाठी चार भरारी पथके
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी रोखण्यासाठी महापालिकेने चार भरारी पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाने ३०६ जणांकडून पावणे दोन लाखांचा दंड वसूल केला आहे.
.....
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चाचण्या वाढवून बेडची संख्याही वाढविण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जात आहेत. याबरोबरच लसीकरणाचेही काम सुरू आहे. आरोग्य विभागाच्या मदतीला आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरविण्यात येत आहे.
- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका