बाळ बोठे याच्यासह सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:28 AM2021-02-27T04:28:00+5:302021-02-27T04:28:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडप्रकरणी फरार आरोपी बाळ बोठे याच्यासह अटकेत असलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडप्रकरणी फरार आरोपी बाळ बोठे याच्यासह अटकेत असलेल्या पाच आरोपींविरोधात शुक्रवारी तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पारनेर न्यायालयात ७३० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.
बाळ जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर), सागर उत्तम भिंगारदिवे (रा. शास्त्रीनगर, केडगाव), आदित्य सुधाकर चोळके (रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता), ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार (रा. प्रवरानगर, ता. राहाता), फिरोज राजू शेख (रा. संक्रापूर आंबी, ता. राहुरी) व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. कडीत फत्तेबाद, ता. श्रीरामपूर) या सहा जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोपपत्रात ९० जणांच्या जबाबांचा समावेश आहे. हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा फरार असला तरी तपासात त्याच्या विरोधात आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. बोठे याला अटक झाल्यानंतर समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्याच्या विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे तपासी अधिकारी पाटील यांनी सांगितले. दरम्यान पारनेर न्यायालयातून हा खटला जिल्हा न्यायालयात वर्ग होणार आहे. ३१ नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात हत्या झाली होती. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांसह पाच आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही.
..............
हत्याकांडाचे रहस्य कायम
बाळ बोठे याने केडगाव येथील सागर भिंगारदिवे याला रेखा जरे यांच्या हत्याकांडाची सुपारी दिली होती. भिंगारदिवे याने आदित्य चोळके याला ही सुपारी दिली. चोळके याच्या सांगण्यावरून फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांनी ३१ नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जरे यांची गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर तीन दिवसांच्या आत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. बोठे मात्र पोलिसांना मिळून न आल्याने हे हत्याकांड कोणत्या कारणामुळे घडवून आणले हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.
..............
बोठेच्या मालमत्तेवर येऊ शकते टाच
जरे यांची हत्या झाल्यानंतर बोठे नगर शहरातून पसार झाला. त्याचा जिल्हा न्यायालयाने व उच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दरम्यान बोठे याच्याविरोधात पारनेर न्यायालयाने स्टॅंडिंग वॉरंट जारी केले आहे. तरीही तो पोलिसांना सापडलेला नाही. बोठे याला फरार घोषित करण्यासाठी व त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी पोलीस आता जिल्हा न्यायालयात अर्ज करणार आहेत. पोलिसांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर बोठेच्या मालकीच्या मालमत्तेवर टाच येऊ शकते.
..........................
आरोपींविरोधात भक्कम पुरावे
रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह इतर आरोपीविरोधात पोलिसांनी भक्कम पुरावे एकत्र करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बोठे व आरोपींमध्ये झालेला संपर्क, सीसीटीव्ही फुटेज, जरे यांच्या राहत्या घरात त्यांनी बोठे याच्या विरोधात लिहिलेले स्वहस्ताक्षरातील पत्र, हत्या घडली तेव्हा प्रत्यक्षदर्शीची साक्ष अशा अनेक पुराव्यांचा समावेश आहे.