चौंडीत धनगर आरक्षणावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 05:48 AM2018-06-01T05:48:11+5:302018-06-01T05:48:16+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे जयंती सोहळ्यात...
जामखेड (जि. अहमदनगर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे जयंती सोहळ्यात गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासमोरच धनगर आरक्षणावरून गोंधळ झाला.
जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या समर्थकांनी सभेत गोंधळ घातला. पोलिसांनी लाठीमार करत भिसे यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यामुळे कार्यक्रमात एकच पळापळ झाली. एका कार्यकर्त्याने भिरकावलेला दगड लागल्याने एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
पालकमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू झाल्यानंतर भिसे यांनी सभामंडपासमोर येत धनगर आरक्षणाची मागणी केली. काही वेळातच दुसऱ्या गटाने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी डॉ. भिसे व त्यांच्या कार्यकर्त्यांना उचलून पोलीस व्हॅनमध्ये बसविले. सभेतून अचानक भिरकावलेला दगड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अण्णा पवार यांच्या डोक्याला लागला.
सुप्रिया सुळे यांनी केले अभिवादन
धनगर, मराठा, मुस्लीम समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे सांगितले होते. चार वर्षे उलटूनही त्यांना आरक्षणाचा निर्णय घेता येईना. शासनाने सर्वांची फसवणूक केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खा. सुळे यांनी अहिल्यादेवींना अभिवादन केले.
शिंदे यांनी आयोजित केलेला कार्यक्रम भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप भिसे यांनी केला. चौंडीत दुसºया कार्यक्रमासाठी त्यांनी परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारून त्यांना जिल्हाबंदी केली होती. चौंडी येथील सीना नदी पात्रात डॉ. भिसे व त्यांच्या सहकाºयांनी जयंती साजरी केली. त्यानंतर ते मुख्य कार्यक्रमास आले होते.
अभ्यासपूर्ण मांडणीने आरक्षणाचा प्रश्न सुटेल - महाजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एक तरी गुण अंगीकारला पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा. त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत होईल. त्यानंतरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल, असे सांगत सुमित्रा महाजन यांनी गोंधळ घालणाºयांना चोख उत्तर दिले.
पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शासकीय कृषी महाविद्यालय सुरू होणार आहे. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात येणार आहे. आरक्षण विधेयकाची प्रक्रिया सुरू आहे.