श्रीरामपूर : समता परिषदेच्या यापुढील सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात मनुस्मृती जाळणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या अपप्रवृत्तींवर गुन्हा दाखल होत नाही. मात्र, मनुस्मृती जाळल्यास गुन्हे दाखल होतात, अशी टीका भुजबळ यांनी केली.श्रीरामपूर येथे बुधवारी जयंत ससाणे यांच्या निधनानंतर ससाणे कुटुंबीयांच्या निवासस्थानी सांत्वनाकरिता ते आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.भुजबळ म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लोकसभेच्या जागावाटपाकरिता बैैठका होत आहेत. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १७ जागांवर एकमत झाले आहे. १४ जागांमध्ये मित्रपक्षांना सामावून घेतले जाईल. काही जागांबाबत बोलणी सुरू असल्याचे भुजबळ म्हणाले. समता परिषदेच्या कामांना गती देण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैैठक घेत आहोत. हजारीबाग, रांची येथे मेळावे घेणार आहोत. डावे पक्षदेखील आपल्यासोबत आहेत. पुढील काळात युवकांना परिषदेत सामावून घेऊ. राज्य सरकारने मराठा व धनगर प्रश्नावर केवळ गाजर दाखविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. त्यात सत्ता मिळविण्यासाठी निवडणूक प्रचारात घोषणा केली. भाजपचे सरकार येणार असल्याची शक्यता नव्हती ही कबुली गडकरी यांनी दिली आहे, असे आरक्षणाच्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले.नगर-नाशिक व मराठवाड्याच्या पाणी संघर्षावर भुबजळ यांनी भाष्य केले. या कायद्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय त्याची दुरूस्ती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, नगर दक्षिणेची जागा युवा नेते डॉ.सुजय विखे यांना सोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न करावेत, अशी मागणी करण ससाणे यांनी भुजबळ यांच्याकडे केली.सभापती सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, मुळा-प्रवराचे उपाध्यक्ष जी.के.पाटील, संजय फंड, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, माजी सभापती नानासाहेब पवार, आशिष धनवटे, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब दिघे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ फंड, नानासाहेब शिंदे, सुनील कुदळे आदी यावेळी उपस्थित होते. सुयोग मंगल कार्यालयात भुजबळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला.ससाणे यांनी विकास केलादिवंगत ससाणे यांच्याशी आपला कौटुंबिक स्नेह होता. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा समान धागा आमच्यात होता. पंकज भुजबळ यांच्या निवडणुकीत ससाणे यांनी मदत केली. काँग्रेसच्या आमदारांचा त्यांनी पाठिंबा मिळविला होता. दिल्लीत अनेक खात्याच्या सचिवांशी त्यांचे मैैत्रीपूर्ण संबंध होते. त्या माध्यमातून मोठी कामे करून दिली. ससाणे यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी करण यांना ताकद देऊ, अशी ग्वाही भुजबळ यांनी ससाणे समर्थकांच्या उपस्थितीत दिली.
यापुढील प्रत्येक कार्यक्रमात मनुस्मृती जाळणार : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 1:58 PM