चॉकलेट - बिस्किटांच्या गोडाऊनला भीषण आग : ६० लाखांचा माल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 04:33 PM2019-06-20T16:33:04+5:302019-06-20T16:33:11+5:30
नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास ) येथील एस.के. एन्टरप्रायजेसच्या चॉकलेट आणि बिस्किटांच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत
केडगाव : नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास ) येथील एस.के. एन्टरप्रायजेसच्या चॉकलेट आणि बिस्किटांच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास ५० ते ६० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी (दि.२०) पहाटे घडली. ही आग सुमारे ९ तास धुमसत होती. महापालिकेच्या अग्निशामक दलाने ७ बंब पाण्याचा मारा करून ही आग नियंत्रणात आणली.
केडगाव ते सारोळा कासार रोडवर सोनेवाडी गावाजवळ संदीप फाटक यांच्या मालकीचे एस.के. एन्टरप्रायजेसचे पारले कंपनीचा माल साठविण्याचे गोडाऊन आहे. फाटक यांच्याकडे पारले कंपनीच्या चॉकलेट व बिस्किटांसह विविध खाद्य पदार्थ्यांच्या उत्पादनाची एजन्सी आहे. या गोडावूनमधून नगर शहर व तालुक्यात हा माल वितरीत केला जातो. त्यामुळे या गोडावूनमध्ये त्यांनी सुमारे ५० ते ६० लाखांचा माल साठवून ठेवलेला होता. बुधवारी (दि.१९) सायंकाळी फाटक व त्यांचे कर्मचारी गोडावून बंद करून घरी गेले होते. गुरुवारी पहाटे २ ते २.३० च्या सुमारास गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. गोडावून मधून धूर बाहेर येवू लागल्याने गोडावून शेजारी राहणा-या नागरिकांनी फाटक यांना फोन करून माहिती दिली. फाटक हे केडगाव येथे राहत असल्याने त्यांनी गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने नगर महापालिकेच्या अग्निशामक दलाला बोलावण्यात आले.
अग्निशामक दलाचे वाहन चालक चिंधू भांगरे, फायरमन बाबा कदम, रवींद्र कोतकर, बाळासाहेब घोरपडे, दत्तू शिंदे, पांडुरंग झिने विजय शिंदे, मच्छिंद्र गायकवाड आदींनी घटनास्थळी जावून आगीवर पाण्याचा मारा केला. गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणावर माल असल्याने आणि सर्व मालाला प्लास्टिकचे आवरण असल्याने आग सुमारे ९ तास धुमसत होती. पहाटे पासून सकाळी ११ वाजेपर्यंत तब्बल ७ बंब पाण्याचा मारा केल्या नंतर आग आटोक्यात आली. परंतु तो पर्यंत सुमारे ५० ते ६० लाखांचा माल जळून खाक झाला असल्याचे संदीप फाटक यांनी सांगितले.