कोपरगाव : शहरातील चार दिवसांच्या १०० टक्के लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बुधवारी नागरिकांची चांगलीच झुंबड पडली होती.
शहरात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने प्रशासनाने १०० टक्के लॉकडाऊन लागू केले होते. प्रशासनाने वैद्यकीय सेवा व पाणी वगळता सर्व सेवा बंद करून १४ एप्रिलपर्यंत कोपरगाव शहर १०० टक्के लॉकडाऊन केले होते. कोपरगाव नगरपरिषदेने चार दिवसांच्या १०० टक्के लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तू संदर्भात वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसारच नागरिकांनी घराबाहेर पडायचे आहे. किराणा दुकान, भाजीपाला विक्री, फळविक्री, चिकन, मटन, मासे विक्री यांच्यासाठी बुधवार, शुक्रवार, रविवार हे वार सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत निश्चित केले आहेत. पिठाची गिरणी दररोज ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरु राहणार आहे.
शुक्रवारी प्रशासनाने खबरदारीच्या दृष्टीने केलेल्या चार दिवसाच्या १०० टक्के लॉकडाऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळाव करून ओढाताण करावी लागली. त्यामुळे या बंदनंतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बुधवार हा पहिलाच वार आल्याने शहरातील नागरिकांनी या वस्तू खरेदी करण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. शहरातील लक्ष्मीनगर, साईनगर हा परिसर २३ एप्रिलपर्यंत सील राहणार आहे. मात्र तेथील नागरिकाना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी भाजीपाला, किराणा तसेच वैद्यकीय सुविधा या तीन वारानुसार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले.