शेवगाव- गेवराई मार्गावरील पुलाची अवस्था आगीतून फुफाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:16+5:302020-12-23T04:17:16+5:30
बोधेगाव : शेवगाव- गेवराई मार्गावरील काळा ओढ्यावरच्या पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या तात्पुरत्या मलमपट्टीने दुरवस्था झाली आहे. पुलावर टाकलेल्या मुरूम- ...
बोधेगाव : शेवगाव- गेवराई मार्गावरील काळा ओढ्यावरच्या पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या तात्पुरत्या मलमपट्टीने दुरवस्था झाली आहे. पुलावर टाकलेल्या मुरूम- मातीचा मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघातही होत आहेत. आधी पावसामुळे साधारणतः महिन्यापासून पाण्याखाली व सद्य:स्थितीला धुरळ्याने पुलाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.
बोधेगावमार्गे मराठवाड्यात जाण्यासाठी शेवगाव- गेवराई हा महत्त्वाचा मार्ग आहे. सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी डबल ट्राली ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रक आदी वाहने तसेच इतर प्रवासी वाहने मोठ्या प्रमाणात धावत आहेत. या मार्गावरील मारुती वस्तीनजीकच्या काळा ओढ्यावरच्या पुलाची बिकट अवस्था झालेली आहे. पूर्णपणे उखडलेल्या पुलावर सध्या केवळ खडी, मुरूम, माती टाकून तात्पुरती सोय केली आहे; परंतु यावरून धावणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ अधिक असल्याने खड्ड्यांची अवस्था पुन्हा ‘जैसे थे’ होते. तसेच मातीमुळे मोठ्या प्रमाणात धुरळा उडत असल्याने वाहनचालकांना समोरून येणारी वाहने अनेकदा दिसत नाहीत. यातून छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. आजूबाजूला असणारे व्यवसायिकही या धुळीने अक्षरशः हैराण झालेले दिसत आहेत.
----
मातीमुळे बाजारपेठेत धुरळा
बोधेगाव येथील बाजारपेठेतील शेवगाव- गेवराई मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. दुरुस्तीसाठी रस्त्याच्या दुतर्फा टाकलेली खडी, दगड साधारणतः १५-२० दिवसांपासून ‘जैसे-थे’ आहे. या दुरवस्थेमुळे बाजारपेठेत वाहनांच्या वर्दळीने कायम धुरळा उडताना दिसतो. सध्यातरी येथील व्यावसायिक, प्रवासी व पादचारी आदींना धुळीचा प्रचंड ताण सहन करावा लागत आहे.
-----
सदरील शेवगाव- गेवराई मार्गावरील काळा ओढ्यावरच्या नवीन पुलासाठी अद्याप मंजुरी मिळालेली नाही; परंतु सध्या डांबराची उपलब्धता पाहून येथील पूल व बाजारपेठेतील खड्ड्यांची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.
-अंकुश पालवे,
सहायक अभियंता, सा. बां. विभाग, शेवगाव.
फोटो ओळी २२ शेवगाव रस्ता
शेवगाव- गेवराई मार्गावरील मातीमय झालेल्या काळा ओढ्यावरच्या पुलाची दयनीय अवस्था व उडणाऱ्या धुरळ्यातून वाट शोधणारी वाहने.