जनावरांच्या लसीकरणावर कोरोनाचा परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:36+5:302021-05-20T04:21:36+5:30
अहमदनगर : कोरोना संसर्गाचा व त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या झाला असला तरी या काळात जनावरांचे लसीकरण ...
अहमदनगर : कोरोना संसर्गाचा व त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या झाला असला तरी या काळात जनावरांचे लसीकरण मात्र अविरत चालू आहे. गेल्या वर्षभरात पशुसंवर्धन विभागाने यात खंड पडू दिला नाही. एफएमडी (लाळ खुरकत) लसीकरणाचा मागील वर्षीचा टप्पा ९५ टक्के पूर्ण झाला असून यावर्षीही जूनमध्ये हे लसीकरण होणार आहे.
सन २०१२ च्या पशुगणनेनुसार नगर जिल्ह्यात गाय, म्हैस, बैल, शेळ्या, घोडे, खेचरे, गाढवे, उंट, डुकरे असे एकूण २८ लाख २१ हजार पशुधन आहे.
यात प्रामुख्याने गाय आणि म्हैस यांना दरवर्षी दोन टप्प्यात एफएमडी (लाळ खुरकत) लसीकरण केले जाते. हीच संख्या पशुधनामध्ये मोठी आहे. दरवर्षी जून आणि नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात हे लसीकरण पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येते. परंतु मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पसरला. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीकरणामध्ये अडथळे आले. तरीही ९० टक्के लसीकरण नोव्हेंबर अखेरपर्यंत संपले होते. मुख्य लसीकरणाचा टप्पा पशुसंवर्धन विभागाने कोरोना काळ असतानाही पूर्ण केला. एप्रिल २०२१ अखेर नगर जिल्ह्यात ९५ टक्के एफएमडीचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
-----------
कोरोनाचे लसीकरण थांबले, मात्र जनावरांचे सुरूच
कोरोना प्रतिबंधक लसीकरण जानेवारीमध्ये नगर जिल्ह्यात सुरू करण्यात आले. परंतु लसीचा तुटवडा असल्याने या लसीकरणात मोठा विस्कळीतपणा जाणवला. अजूनही अनेक ठिकाणी लस मिळत नाही. तर काही ठिकाणी लसीकरण बंद पडले आहे. दुसरीकडे मात्र जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाने कोणताही अडथळा न येता सुरू ठेवले आहे.
----------
कोरोनाच्या काळात जनावरांच्या लसीकरणात अडथळे आले. मात्र, त्यावर मात करून पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम तडीस नेली. यावर्षीही लसीकरणाचा टप्पा जूनपासून सुरू होत आहे. तोही पूर्ण होणार यात शंका नाही.
- सुनील तुंबारे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग
-------------
दिवाळीच्या वेळी गाई-म्हशींचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाने पूर्ण केले. आताही जूनमध्ये लसीकरण असल्याचे समजते.
- रावसाहेब कदम, पशुपालक
------------
दरवर्षी आमच्या जनावरांचे सरकारी लसीकरण होते. यंदा कोरोनाची गंभीर स्थिती आहे. कोणी कोणाकडे येत नाही. त्यामुळे लसीकरण होईल की नाही याबाबत अद्याप माहिती नाही.
- तुकाराम हिंगे, पशुपालक
--------------
जूनमध्ये १४ लाख ४० हजार जनावरांना लसीकरण
१ जूनपासून एफएमडी लसीकरणाला नगर जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १४ लाख ४० हजार जनावरांना हे लसीकरण होणार आहे. ३१ जूनपर्यंत हे लसीकरण संपविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा प्रयत्न आहे.
-------------
जिल्ह्यातील जनावरांची संख्या
गायी १४२७१८५
म्हशी २२१३६३
मेंढरे ३६१८२६
शेळ्या ७९२०१०
घोडे ३७८९
खेचर ७
गाढव १३९७
उंट ६
डुकरे १३९६०
-------------------
एकूण २८२१५४३
------------------------
वर्षभरात प्रामुख्याने तीन लसीकरण
जनावरांना प्रामुख्याने तीन प्रकारच्या लसी वर्षभरात दिल्या जातात. त्यात गाई आणि म्हशी यांना एफएमडी म्हणजे लाळखुरकतची लस वर्षातून दोनदा दिली जाते. पावसाळ्यापूर्वी नदीकाठच्या गावांतील जनावरांमध्ये घटसर्पचे लसीकरण केले जाते. डोंगरी भागात फऱ्या रोगाचे लसीकरण होते. याशिवाय यंदा जिल्ह्यातील सर्व ११ लाख शेळ्या-मेंढ्यांना पीपीआर लसीकरण केले जाणार आहे.
----------