कोरोना लसीकरण ठरविणार शाळांचे भवितव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:20 AM2021-05-16T04:20:08+5:302021-05-16T04:20:08+5:30
अहमदनगर : पुढील सत्रात शाळा सुरू होणार का, यासंदर्भात सध्यातरी कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. लसीकरण किती लवकर पूर्ण होते, ...
अहमदनगर : पुढील सत्रात शाळा सुरू होणार का, यासंदर्भात सध्यातरी कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. लसीकरण किती लवकर पूर्ण होते, त्यावर शाळांचे भवितव्य ठरणार आहे. कारण, लसीकरण झाले तरच सुरक्षितपणे शाळा सुरू करता येणार आहेत. मात्र लसीकरणच कासवगतीने सुरू असल्याने यंदाच्या सत्राचे भवितव्य अधांतरीच आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. या काळात शिक्षकांनी मुलांना ॲानलाइन अभ्यासक्रम शिकवून मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. या लाटेनंतर आता कोरोनावर लस आली आहे. सर्वत्र लसीकरण सुरू झाल्याने कोरोना आटोक्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र लसीकरणाचा वेग अतिशय कमी असल्याने सर्व नागरिकांना लस देण्यासाठी वर्षभराचाही कालावधी लागू शकतो. त्यामुळे जोपर्यंत सर्वांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करणे शक्य नाही. परिणामी, चालू सत्र म्हणजे चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्यावर प्रश्नचिन्हच आहे.
----------
६८ हजार ७०० हजार विद्यार्थी थेट दुसरीत
कोरोनाच्या स्थितीमुळे मागील वर्षी शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यंदाही कोरोनाची स्थिती आटोक्यात नसल्याने पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात मागील वर्षी पहिलीत असलेले ६८ हजार ७०० विद्यार्थी थेट दुसरीत जाणार आहेत.
-----------
जोपर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू करणे शक्य नाही. लसीकरणाचा वेग पाहता जुलैपासून लसीकरण होईल, असे वाटत नाही. शिवाय शासनाने तिसऱ्या लाटेचाही इशारा दिला आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती निवळली नाही, तर शाळा सुरू होणार नाहीत. मागील वर्षीप्रमाणेच ॲानलाइन अभ्यासक्रम देऊन शिक्षण सुरू ठेवावे लागणार आहे.
- गुलाब सय्यद, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
-----------
वर्षभर घरी राहिल्याने कंटाळा आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू व्हाव्यात, अशी इच्छा आहे. खूप दिवसांपासून मित्रांना भेटलेलो नाही. मोकळ्या वातावरणात जाता येत नसल्याने कंटाळवाणा दिनक्रम झाला आहे.
- अंकुश पोटोळे, विद्यार्थी, पाचवी.
-----------
कोरोनाची सध्याची लाट भयंकर आहे. त्यामुळे यंदाच्या सत्रात शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
- रोहिदास ठाकूर, पालक
---------
ऑनलाइनचाच पर्याय
कोरोनाची लाट अजून आटोक्यात आलेली नाही. अजून सहा महिने तरी स्थिती पूर्वपदावर येईल असे वाटत नाही. त्यामुळे मागील वर्षीसारख्या यंदाही शाळा ऑनलाइन सुरू होण्याची शक्यता आहे.