अहमदनगर : लवकरच कोरोना थ्री स्टेजला पोहोचणार आहे. आता सर्वांनीच अतिदक्षता घ्यावयाची आहे. दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुऊन घ्या, वृत्तपत्रे बंद करा, नाहीतर दुस-या दिवशी वाचा....अशा अनेक सूचना असलेला संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. विशेष म्हणजे हा संदेश जिल्हाधिकारी यांच्या नावाने, तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून फिरत आहे. जिल्हाधिकारी किंवा कोणत्याही प्रशासनाकडून हा संदेश दिलेला नसतानाही केवळ ही अफवा आहे. मात्र या अफवाखोरांवर अद्याप कारवाई करण्याचा साधा इशारही प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणा-यांवर आता कारवाई कोण करणार ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
कोरोना थ्री स्टेजमध्ये पोहोचणार आहे, असे सांगून काळजी घ्या, दक्षता घ्या, या शिर्षकाखाली १७ प्रकारची काळजी घ्या, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या सूचना इतरानांही द्या, असेही त्यात म्हटले आहे. काही लोक जिल्हा माहिती कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांचे आवाहन अशा स्वरुपात हा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भीती तयार झाली आहे. तसेच असा मेसेज फॉरवर्ड करण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. मात्र असा कोणताही संदेश प्रशासनाने तयार केलेला नाही. असा कोणताही मेसेज जिल्हा माहिती कार्यालयाने किंवा प्रशासनाने तयार केलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचे बनावट मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केलेले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून हा संदेश फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. तसेच हा संदेश व्हायरल करणा-यांवर आता कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.