साईमंदिराच्या सुवर्ण शिखरावर मंगळवारी सूर्योदयाला गुढी उभारण्यात आली.
संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व वैशाली ठाकरे यांच्या हस्ते गणपती, वरुण यांच्यासह ब्रह्मध्वजाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. या विधीचे पौरोहित्य बाळासाहेब जोशी, अमित देशमुख आदींनी केले. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
स्वच्छ केलेल्या वेळुच्या काठीवर केशरी रंगाचे नवीन वस्त्र, चांदीचा कलश, लिंबाचा डहाळा इत्यादी बांधून ब्रह्मध्वज मंदिर शिखराच्या पूर्व बाजूस बांधण्यात आला. त्याची विधिवत पूजा करून लिंबाचा फुलोरा, हिंग, मिरे, गूळ आणि चिंच यांच्या मिश्रणाचा नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला.
सध्या मानवजातीवर आलेले कोरोनाचे संकट लवकर निवारण करून जगभरात सुख, शांती, समृद्धी नांदावी यासाठी रवींद्र ठाकरे व वैशाली ठाकरे यांनी साईबाबांना साकडे घातले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने साईबाबांच्या मूर्तीवर सुवर्णालंकार, सुवर्णमुकुट घालण्यात आला. याशिवाय साखरेच्या गाठीकड्यांचा हारही घालण्यात आला.
गुढीपाडव्याला नवीन मराठी वर्ष सुरू होते. यावेळी गुढीपूजनानंतर पंचागस्य गणपतीचे पूजन करून संवत्सर फल वर्तवले जाते. पुरोहित बाळासाहेब जोशी यांनी याबाबत सांगितले की, सध्या सुरू असलेली रोगराई लवकरच संपणार आहे. जुलैपासून रोगराईला उतार पडून ऑक्टोबरमध्ये राेगराई संपेल व जनजीवन पूर्वपदावर येईल. यंदा चांगला पाऊस पडेल, धनधान्य, दुध-दुभते मुबलक होईल.