अहमदनगर : गेल्या तीन-चार महिन्यांपासून सर्वच मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळ्यांना गर्दी होत आहे. किमान एक हजारांच्यावरच गर्दी होत आहे. बहुतांश ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही होत नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यांना होत असलेली गर्दी रविवारी ओसरलेली पहायला मिळाली. अनेकांनी ५० चा नियम असल्याने लग्नाला येऊच नका, असे सोशल मीडियावरून विशेष आवाहन केले आहे.
अनलॉक झाल्यानंतर विवाह सोहळ्यांसाठी फक्त ५० लोकांनाच परवानगी दिलेली होती. तोच नियम अद्यापही कायमच आहे. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालयांचे मालक कोणीही नियमांचे पालन करीत नव्हते. त्यामुळे मोठ्या मंगल कार्यालयात एक हजारांपेक्षा जास्त लोक एकत्र आल्याचे पहायला मिळाले. जेवणावळीसाठीही मोठी गर्दी होती. यामध्ये बहुतांश लोक मास्कही वापरत नसल्याचे आढळून आले होते. दुसरीकडे प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्याने ही गर्दी वाढत होती. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी (दि. १८) तातडीने सर्व मंगल कार्यालयांची बैठक घेऊन सूचना केल्या. त्यामध्ये मंगल कार्यालयात एकाच वेळी ५० लोकांना मंगल कार्यालयात थांबता येईल, असा नियम अनिवार्य करण्यात आला. तसेच सामाजिक अंतर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्याची जबाबदारी मंगल कार्यालयांवर टाकण्यात आली. त्यामुळे रविवारी नगर शहर व परिसरात झालेल्या विवाह सोहळ्यांमध्ये गर्दीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले.
----------
विवाह सोहळ्यातही असा झाला बदल......जेवणाची पंगत लग्नाआधीच सुरू झाली
जेवण झालेले लग्नासाठी थांबले नाहीत
टप्प्याटप्प्याने लोकांची लग्नात उपस्थिती
मंगलाष्टकांची संख्या कमी केल्याने गर्दी ओसरली
नातेवाइकांशिवाय इतरांना घरी जाण्याचे आवाहन
गर्दी टाळण्यासाठी मंगल कार्यालय मालकांचे नियोजन
जेवणानंतर परगावाहून आलेल्यांना लगेच रवाना झाले
----------------
चक्क....लग्नाला न येण्याचे आवाहन
बोल्हेगाव येथील वाकळे आणि नागापूर येथील कातोरे परिवारातील एक विवाह सोहळा नगर-मनमाड रोडवरील एका मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या लग्नाच्या दोन्ही परिवारांनी मोठ्या प्रमाणावर निमंत्रण पत्रिकांचे वाटप केले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ लग्न सोहळ्यासाठी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी दिल्याने दोन्ही परिवाराने चक्क विवाह सोहळ्यासाठी येऊ नका, अशी पत्रिका छापून सोशल मीडियावर प्रसारित केली. विवाह सोहळा गर्दी न होता केवळ कौटुंबिकस्तरावर होईल, असे दोन्ही परिवाराने जाहीर करून गर्दी टाळली. ही पत्रिका सोशल मीडियावर चांगलीच फिरली.
--
फोटो- २१ कातोरे
-------
लग्नासाठी काय आहे नियम
लग्न समारंभातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी लग्नसमारंभात एकावेळी ५० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती व ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबत कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पोलीस प्रशासन, महापालिका, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याध्याकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
--------