साईनगरीत मानवतेच्या दरबारी  माणुसकीला कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 02:52 PM2019-12-15T14:52:27+5:302019-12-15T14:52:49+5:30

वर्षभरात साईनगरीत तब्बल ८८ व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  केवळ ऐवढेच नाही तर मानवतेच्या दरबारी माणुसकीला कोलदांडा घालणारे प्रकार सर्रास सुरू आहेत. 

The court of humanity in Sainagore borders on humanity | साईनगरीत मानवतेच्या दरबारी  माणुसकीला कोलदांडा

साईनगरीत मानवतेच्या दरबारी  माणुसकीला कोलदांडा

प्रमोद आहेर ।  
शिर्डी : वर्षभरात साईनगरीत तब्बल ८८ व्यक्ती गायब झाल्या आहेत. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  केवळ ऐवढेच नाही तर मानवतेच्या दरबारी माणुसकीला कोलदांडा घालणारे प्रकार सर्रास सुरू आहेत. यात गुन्हेगारी व स्वार्थी लोकांबरोबरच शासकीय यत्रंणाही तितक्याच जबाबदार आहेत़
भाविकांची पाकीटमारी, वस्तू किंंवा मोबाईलची चोरी होते. चोरीचा तपास करावा लागत. त्यामुळे पोलिसात चोरी ऐवजी हरवल्याची तक्रार करायला सांगितली जाते. त्यासाठीही अनेक तास भाविक पोलीस ठाण्याच्या आवारात तिष्ठत असतो. व्हीआयपींच्या सेवेत चोवीस तास राहणा-या पोलिसांना सामान्य भाविकांची तक्रार ऐकायलाही वेळ नसतो़. काही व्यवसायिक भाविकांची फसवणूक करतात. त्यावर कठोर कारवाई होत नाही. अन्य राज्यात बाहेरील पर्यटकांच्या वाहनांना पोलीस मदत करतात. इथे तपासणीच्या नावाखाली भाविकांना अक्षरश: त्रास दिला जातो़. शिर्डीत हजारो वाहनांद्वारे बेकायदा प्रवाशी वाहतूक होत असतांना त्याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करून भाविकांच्या वाहनाला किरकोळ कारण काढून आर्थिक भुर्दंड दिला जातो़ विशेषत: गुजरातचा भाविक महाराष्ट्राच्या हद्दीत शिरला की शिर्डीत येईपर्यंत महामार्ग पोलीस व नागरी पोलीस ठिकठिकाणी तपासणीच्या नावाखाली त्रास देतात. रस्त्यावरून येणाºया-जाणा-या व्हीआयपी, वरिष्ठ अधिका-यांच्या देखतही हे बिनदिक्कम सुरू असते. शहराची व महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा यातून खराब होते.
साईबाबा संस्थानने गेल्या दोन-तीन वर्षात जवळपास पावणे दोनशे कोटी रूपये बाहेर दिले. शिर्डीत मात्र सीसीटीव्ही बसवण्यासाठी देणगीदार शोधले जातात. मंदिर परिसरात पावणे दोनशे कॅमे-यांची गरज आहे. तिथे शंभरच सुरू होते, आता अनेक भक्तांच्या देणगीतून अठ्ठेचाळीस वाढले आहेत. त्यांची क्षमताही सुमार आहे. संस्थान भक्तनिवास, प्रसादालय, रूग्णालये इथे सीसीटीव्हीची मोठी आवश्यकता आहे,  भाविकांचे हरवणे, त्यांना लुबाडणे याच परिसरात होत असते. संस्थान अनेक वर्षापासून हा मुलभूत प्रश्न सोडवू शकले नाही. हा प्रश्न मार्गी लागण्याऐवजी टाईम दर्शनच्या माध्यमातून भाविकाला त्रास व खासगी एजन्सीला धंदा मिळवून देण्यात संस्थानला धन्यता वाटते.
अडीच वर्षापूर्वी राज्य शासनाच्या आयटी विभागाने शिर्डीत जवळपास ७४ कोटींचा आराखडा बनवला. त्यात नेमके काय आहे याची स्पष्टता नसल्याने संस्थानने निधी दिला नाही. आता ही रक्कम ९५ कोटीवर गेल्याचे समजते. शहरात स्मार्टसिटी अंतर्गत सीसीटीव्ही बसवायला इतकी रक्कम लागते का? हा सामान्य भाविकच नाही तर संस्थानच्याही आकलना बाहेरचा विषय आहे.
शिर्डीकरांनी शहराचा लौकिक वाढवण्यासाठी भाविकांच्या लुटीत सहभागी न होता, भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात केवळ निवेदन देऊन बातमीपुरती समाजसेवा न करता सबंधितांना जाब विचारल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकेल़.

Web Title: The court of humanity in Sainagore borders on humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.