घराचे अंगणच बनले स्नेहसंमेलनाचे व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:25 AM2021-08-24T04:25:07+5:302021-08-24T04:25:07+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ऑनलाईन स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची परंपरा यंदाही ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ऑनलाईन स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. घरासमोरील अंगणच विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे व्यासपीठ बनले.
स्नेहसंमेलनात देशभक्तीपर गीते, विविध विषयांवरील भाषणे, गीतगायन, नाट्य अशा विविध प्रकारांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. दीड वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयेही बंद आहेत. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट बंद झाल्याने शालेय परिसरात शुकशुकाट आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी वर्ग, फळा, शिक्षक, दृकश्राव्य शैक्षणिक साधने, वर्ग मित्रांबरोबर सुसंवाद, चर्चा हे सर्व बंद पडले. यामुळे बालमनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाल्याचे दिसते. त्यात उत्साह निर्माण करण्यासाठी व बालमनाला आनंद देऊन वैविध्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे ठरताच विद्यार्थीही ऑनलाईन सहभागी झाले. अतिशय देखणा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केल्याचे संयोजिका पूर्णिमा पठारे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगेही सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनही आनंद व उत्साहाची पर्वणी असते, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
संमेलन यशस्वीतेसाठी पौर्णिमा पठारे, सीमा मेरगु, प्रतीक्षा पचारणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कल्पना जगताप, शुभांगी पवार, शैला औटी, ज्योती सोनवणे, रामेश्वर काळे आदी शिक्षक, पालक, विद्यार्थी सहभागी झाले होते.