लोकमत संवाद
शेवगाव : शहरवासीयांचे जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या पाणी, आरोग्य, स्वच्छता आदी प्रश्न येत्या काळात मार्गी लावण्यात येतील. अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, मालमत्ता कर, कोलमडलेले पाणी नियोजन, प्लास्टिक बंदी, स्वच्छता, आरोग्य आदी विषयांवर भर देणार आहे. नळ कनेक्शन अधिकृत न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नगरपरिषदचे प्रशासक म्हणून नियुक्त झालेले प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी ‘लोकमत’ संवाद साधताना दिला आहे.
शेवगाव नगरपरिषदेत अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. त्याचा निपटारा कसा करणार?
कामगारांचे थकीत वेतन, विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी, नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष प्रयत्न करताना, सातबारा ऑनलाईन करण्यात आला आहे. मालमत्ता कर थकबाकी आहे, अशा लोकांना सातबारा मिळणार नाही. कर थकबाकी असलेल्या विविध संस्था व लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये वीजवितरण कंपनी, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोबाईल टॉवर, मंगल कार्यालय, हॉटेल व्यावसायिक, जिनिंग प्रेसिंग आदी संस्थांचा समावेश आहे. संबंधितांनी वेळेत थकबाकी न भरल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
थकीत मालमत्ता कराविषयी आपली भूमिका काय राहणार आहे?
मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी चार कर निरीक्षकांना २१ प्रभाग वाटून देत त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. 'त्या' कर निरीक्षकांना वसुलीचा अहवाल रोज सायंकाळी सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. थकबाकी लवकर न भरल्यास संबंधितांची नावे चौकात फलकावर लावली जाणार आहेत.
आगामी उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन शहरातील कोलमडलेली पाणी वितरण व्यवस्था सुरळीत सुरु करण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शन धारकांना येत्या सात दिवसात नळ कनेक्शन अधिकृत करुन न घेतल्यास ते कनेक्शन तोडून दंडात्मक तसेच वेळप्रसंगी फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन शहरातील नागरिकांना लवकरच चार दिवसांनी वेळेवर पाणी कसे देता येईल यासाठी नियोजन व उपाययोजना आखण्यात येणार आहे.
शेवगाव शहरात कचऱ्याची समस्या आहेे. ती कशी सोडविणार?
शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्लास्टिक विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सर्व दुकानदारांनी दुकानातील ओला व सुका कचरा रस्त्यावर न फेकता दुकानात दोन डसबिन ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. १५ दिवसात दुकानात डसबिन न दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरातील ओपन पेसची पाहणी करण्यात येऊन माझी वसुंधरा योजनेंतर्गत वृक्ष लागवड, बाल उद्यान उभारण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकाम सुरु असलेल्यांनी तत्काळ नगरपरिषदेची बांधकाम परवानगी घ्यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल.
वाढते अतिक्रमण, वाहतूक कोंडी, आठवडे बाजाराचा प्रश्नाबाबत काय निर्णय घेणार?
शेवगाव शहरातील अतिक्रमण लवकरच काढण्यात येतील. आठवडे बाजार जागेचा प्रश्नही मार्गी लावला जाईल. मंगल कार्यालयाच्या बाबतीत चटई क्षेत्राचे उल्लंघन, बांधकाम परवाना, मालमत्ता कर आदी तक्रारी आहेत, त्याची शहानिशा करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाला हॉटेल, खाद्य पदार्थ विक्री करणारे गाडी आदी ठिकाणी तपासणी करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी लवकर पोलीस, बांधकाम विभागाची बैठक घेऊन वाहनाची कोंडी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील.