अहमदनगर जिल्ह्यातील ब्युटी पार्लरची संख्या मोठी आहे. प्रत्येक तालुक्यात शहर व ग्रामीण भागातील महिलांनी कौशल्यातून सुरू केलेल्या ब्युटी पार्लर व्यवसायातून त्यांच्या कुटुंबासाठी हातभार लागतोच. परंतु, त्याचबरोबरच यातून अनेक महिला, मुलींना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. लग्नसराईच्या महिन्यात हा व्यवसाय तेजीत चालतो. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीचा लॉकडाऊन व आता ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घातलेले निर्बंध यामुळे ऐन लग्नसराईच्या काळात पार्लर बंद ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. पूर्वी कॉस्मेटिक्स दुकानांमध्ये पार्लरसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असायची. मात्र, विवाहसोहळे व इतर कार्यक्रमांना बंदी असल्याने ब्युटी पार्लर व कॉस्मेटिक्स या दोन्ही व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. भाडेतत्त्वावर गाळा घेऊन अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला. त्याचे भाडेही थकले आहे.
--------------
१६ वर्षांपासून मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. या कामाच्या माध्यमातून परदेश दौरे देखील झाले आहेत. मुंबई, पुणे, संगमनेर येथे मिळून माझ्या एकूण पाच शाखा आहेत. येथे ६८ लोक काम करतात. कोरोनामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद असल्याने या क्षेत्रात शंभर टक्के बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच मेकअप आर्टिस्ट मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
----------------
मेकअप आर्टिस्ट कृष्णा, संगमनेर
--------------
तीन वर्षापूर्वी ब्युटी पार्लर सुरू केले. त्यावेळी मुद्रा लोन व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. सर्व काही सुरळीतपणे सुुरू असताना अचानक कोरोनाचे संकट आले. गेल्या वर्षभरापासून काम कमी झाले. घेतलेले कर्ज थकले आहे. लग्नसराई असल्याने भरलेला माल तसाच पडून आहे.
सारिका सागर सस्कर, ब्युटी पार्लर व्यावसायिका, संगमनेर
---------------
वर्षभरात अनेकदा तसेच सणवारानिमित्त ब्यूटी पार्लरमध्ये जाणे व्हायचे, परंतू कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून पार्लरमध्ये जाणे शक्य झाले नाही. सध्या पार्लर बंदच आहे. तसेच माझ्यासारख्या अनेक महिला ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचे टाळत आहेत.
चैताली मिलिंद कुलथे, गृहिणी, संगमनेर
------------
ब्युटी पार्लरसाठी लागणाऱ्या सर्व नामांकित कंपन्यांच्या कॉस्मेटिक्सचा पुरवठा आम्ही राज्यभर करतो. या व्यवसायाची उलाढाल मोठी आहे. आमच्या सारखेच छोटे-मोठे डीलर्स राज्यभर आहेत. कोरोनामुळे कॉस्मेटिक्स व्यवसायावर ८० टक्के परिणाम झाला आहे.
वैभव रमेश ढोरे, होलसेल कॉस्मेटिक्स व्यावसायिक, संगमनेर
--------------