दहिगाव बंधा-यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:52 PM2017-11-06T15:52:33+5:302017-11-06T15:53:56+5:30
नगर तालुक्यातील दहिगाव येथे असणा-या सीना नदीच्या पात्रात गावक-यांनी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. याची साठवण क्षमता जवळपास १ टी.एम.सी. इतकी आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या बंधा-यात चांगला पाणी साठा झाला होता. दुष्काळी असणा-या या गावात कधी नव्हे तो इतका पाणी साठा झाल्याने गावात आनंदाचे वातावरण होते.
योगेश गुंड
केडगाव : नगर तालुक्यातील दहिगाव येथील बंधा-याचे दरवाजे बदलण्यासाठी शासनाकडून २३ लाख रुपयांचे नवे दरवाजे आले. मात्र जुने दरवाजे पाटबंधारे विभागाने वेळेत न बदलल्याने या बंधा-याला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरु आहे. गावक-यांनी जलयुक्त शिवाराचे पाहिलेले स्वप्न आता बंधा-याच्या पाण्यात वाहून जाताना पाहण्याची दुर्दैवी वेळ दहिगावकरांवर आली आहे.
नगर तालुक्यातील दहिगाव येथे असणा-या सीना नदीच्या पात्रात गावक-यांनी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. याची साठवण क्षमता जवळपास १ टी.एम.सी. इतकी आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या बंधा-यात चांगला पाणी साठा झाला होता. दुष्काळी असणा-या या गावात कधी नव्हे तो इतका पाणी साठा झाल्याने गावात आनंदाचे वातावरण होते. या गावाचा समावेश जलयुक्त योजनेत करण्यात आला आहे. या योजनेतून याच बंधा-याचे जुने दरवाजे बदलून नवे दरवाजे टाकण्यात येणार होते. त्यासाठी शासनाचा २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झालो. याच निधीतून या बंधाºयासाठी नवे दरवाजे गावात दाखल झाले. काही दरवाजे येणे बाकी होते.
सरपंच मधुकर म्हस्के व गावक-यांनी जुने दरवाजे काढून नवे दरवाजे बसवण्यात यावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र जुने दरवाजे न काढताच नवे अर्धवट दरवाजे बसवण्याचे काम सुरु झाले़ त्यामुळे या बंधा-यातील पाण्याला गळती सुरु झाली. इतके दिवस साठवलेले लाखो लिटर पाणी आता वाहून जात आहे. बंधा-याचे खालील दरवाजातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत गावक-यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली़ मात्र, उपयोग झाला नाही.
गावात असणा-या या बंधा-यात जवळपास १ टी. एम. सी. इतका पाणी साठा आहे. आता हे पाणी वाहून जात आहे. बंधा-यातील पाण्यामुळे गावाची दुष्काळातून सुटका होईल, असे वाटत असतानाच बंधा-याला गळती लागली अन् लाखो लीटर पाणी वाहून जाऊ लागले आहे.
गावातील बंधा-याचे दरवाजे बदलण्यासाठी काही नवे दरवाजे बसवण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र जुने दरवाजे काढावेत, अशी अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या बंधा-यातील पाण्यामुळे गावाचे शिवार जलमय झाले होते. आता बंधा-याला मोठी गळती सुरु असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
-मधुकर म्हस्के, सरपंच, दहिगाव