दोन दिवसात तीन हजार किलो गोमांस जप्त : संगमनेर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:42 PM2019-05-14T15:42:34+5:302019-05-14T15:42:53+5:30
गोवंश जनावरांची कत्तल होत असलेल्या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये तीन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले.
संगमनेर : गोवंश जनावरांची कत्तल होत असलेल्या ठिकाणी संगमनेर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये तीन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवार व सोमवारी या दोन दिवसात करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास रहेमतनगर परिसरातील म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे करण्यात आलेल्या कारवाईत १२०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. यात पोलीस कॉँस्टेबल सागर दत्तात्रय धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतिक युनुस शेख (रा.भारतनगर, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास मदिनानगर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत १८०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. यात पोलीस कॉँस्टेबल गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जहिर अन्वर कुरेशी (रा. मदिना नगर, संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील रहेमतनगर व मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गोपाळ उंबरकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह सदर ठिकाणी छापे टाकले असता मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही कारवाईत एकूण तीन हजार किलो गोमांस जप्त करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक उंबरकर, सहायक फौजदार अण्णासाहेब वाघ, पोलीस हेडकॉँस्टेबल आयुब शेख, राजेंद्र डोंगरे, पोलीस नाईक राजेंद्र घोलप, आर.एम. सानप, चालक पोलीस नाईक सुरेश गोलवड, अजय आठरे, आशिष आरवडे, पोलीस कॉँस्टेबल सचिन उगले, सागर धुमाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस नाईक सानप व सहायक फौजदार वाघ तपास करीत आहे.