बेलापूर : शौचालयातील मैला काढताना वायुमुळे गुदमरुन टाकीत पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. अन्य एक जण अत्यवस्थ असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मयताचे नाव ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे (वय ३५)असे आहे. बेलापूर खुर्द येथील हुरे वस्तीवर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. तेथील सुकदेव पुजारी यांनी शौचालयातील मैला काढण्याचे काम बेलापूर बुद्रूक येथील रवि राजू बागडे व ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे यांना दिले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हे मैला काढण्यासाठी पुजारी वस्तीवर गेले. मैला असलेली टाकी पाच फूट खोल होती. त्यांनी टाकीवरील झाकण बाजूला काढले व मैला काढण्यासाठी टाकीत उतरु लागताच वायूमुळे ज्ञानेश्वर हा बेशुध्द होऊन टाकीत पडला. त्याला मदत करण्याच्या प्रयत्नात रवि बागडे हादेखील टाकीत उतरला. तोही बेशुध्द पडला. आसपासच्या नागरिकांनी तातडीने दोघांनाही बाहेर काढले व साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर पोपट गांगुर्डे यास मृत घोषित केले.जखमी रवि बागडे याचेवर उपचार सुरु असून त्यास लोणी येथे प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची असून मिळेल ते काम करुन ते कुटुंबाचा चरितार्थ चालवित होते. मयत ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून हवालदार अतुल लोटके पुढील तपास करीत आहेत.
शौचालयाची टाकी साफ करताना तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:52 AM