गुंठाभरही जमीन नसताना कर्जमाफीचा एसएमएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 07:50 PM2018-04-06T19:50:56+5:302018-04-06T19:51:23+5:30
गुंठाभरही जमीन नावावर नसलेल्या मजुराला कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र बँकेत चौकशी केल्यावर खात्यात फक्त पूर्वीचेच अडीच हजार शिल्लक असल्याचे समजल्यावर आनंदावर विरजण पडले.
श्रीगोंदा : गुंठाभरही जमीन नावावर नसलेल्या मजुराला कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर प्राप्त झाला. मात्र बँकेत चौकशी केल्यावर खात्यात फक्त पूर्वीचेच अडीच हजार शिल्लक असल्याचे समजल्यावर आनंदावर विरजण पडले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. आधार कार्ड, बँक खाते, कर्जखाते आणि मोबाईल नंबर अशी सविस्तर माहिती अर्ज करताना घेतली. अर्ज दाखल करताना ग्रामीण शेतक-यांची चांगलीच ससेहोलपट झाली. एवढे सोपस्कार पार पाडल्यानंतरही कर्जमाफी योजनेचे अनेक किस्से ग्रामीण भागात घडत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मनोज भिमराव छत्तिसे यांना कर्जमाफीची रक्कम सेंट्रल बँकेच्या खात्यात जमा झाल्याचा एसएमएस मोबाईलवर आल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटले. नावावर गुंठाभरही जमीन नाही त्यामुळे योजनेसाठी अर्जही केला नसताना रक्कम खात्यावर कशी जमा झाली ? असा प्रश्न त्यांना पडला. बँकेत चौकशी केल्यानंतर कसलीही रक्कम जमा झाली नसल्याचे समजले. कर्जमाफीचे अर्ज मागविताना सगळी प्रक्रिया आॅनलाईन करुनही माफी एकाला आणि एसएमएस भलत्यालाच असेही प्रकार झाले आहेत.