पहिलीच्या पटसंख्येत तीन हजारांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:26 AM2018-08-29T11:26:30+5:302018-08-29T11:26:51+5:30

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.

The decline of three thousand in the first sentence | पहिलीच्या पटसंख्येत तीन हजारांची घट

पहिलीच्या पटसंख्येत तीन हजारांची घट

अहमदनगर : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटीचे सत्र सुरूच असून,चालूवर्षी पहिल्याच्या वर्गातील पटसंख्येत तीन हजारांनी घट झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक यंदाही अतिरिक्त ठरणार असल्याचे उघड झाले आहे.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी शिक्षण समितीकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क जिल्हा परिषदेने भरले. याशिवाय अनेक उपक्रम वर्षभरात राबविण्यात आले. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या स्थिर राहिल, अशी अपेक्षा शिक्षण समितीला होती. मात्र शिक्षण विभागाच्या अहवालानुसार पहिलीच्या वर्गातील पटसंख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्याच्या वर्गात ३ हजार ३४१ एवढे कमी प्रवेश झाले़ गेल्या २०१०पासून पटसंख्या घटीचे सत्र सुरू आहे. ते अद्याप पाट सोडायला तयार नाही़ फरक एवढाच की पूर्वीची घट ही ५ ते १० हजारांच्या घरात असे़. ती आता ३ ते ४ हजारांवर आली आहे. याचाच अर्थ पटसंख्या स्थिर ठेवण्यात जिल्हा परिषदेला अद्याप यश आलेले नाही.
जिल्हा परिषद शिक्षकांनी गावोगावच्या शाळेत दाखल पात्र असलेल्या मुलांचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षण शाळा सुरू होण्याआधीच केले होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सहा वर्षांहून अधिक वय असलेली ४१ हजार ३३९ मुले होती़ प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यानंतर यापेक्षा अधिक मुलांनी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. तसा अहवाल शिक्षण विभागाने समितीला सादर केला आहे. सर्वेक्षण करताना सहा वर्षे वय असणाऱ्या मुलांचेच सर्वेक्षण करण्यात आले, पण, शाळा सुरू झाल्यानंतर ५ वर्षे आणि ८ महिने पूर्ण असलेल्या मुलांना प्रवेश देण्याचा आदेश आला. त्यामुळे ही पटसंख्या वाढली असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणने आहे.

अशी घटली पटसंख्या
अकोले-९२, संगमनेर-७८, कोपरगाव-९३, श्रीरामपूर-२५, राहाता-३०, राहुरी-४०, नेवासा-६४९, शेवगाव-३२, पाथर्डी-३५, जामखेड-६८, कर्जत-४६, श्रीगोंदा-५७, पारनेर-५०, नगर-५८

सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
शाळा सुरू होण्याआधी शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात दाखलपात्र मुलांची संख्या ४१ हजार ३३९ आहे. यंदा पहिलीच्या वर्गात घेतलेल्या मुलांची संख्या ४४ हजार ३३४ एवढी आहे.  चालूवर्षी एकही मुलगा खासगी शाळेत गेला नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून, सर्वेक्षणावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: The decline of three thousand in the first sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.