अहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे शनिवारी दुपारी सुरू झालेले काम रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. त्यामुळे उपनगरांत तिसऱ्या दिवशी रविवारीही निर्जळी होती. शनिवारी पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला आता सोमवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या १००० व ७०० एमएम व्यासाच्या जलवाहिनीला नांदगाव शिवारात गळती लागली होती. दरम्यान मुळा धरणातील रोहित्र दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा शनिवारी खंडित करण्यात आला होता. यावेळेतच नांदगाव येथील दुरुस्तीचे काम मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले होते. शनिवारी दिवसभरात हे काम पूर्ण होईल, असा पाणीपुरवठा विभागाचा अंदाज होता. परंतु, दुरुस्तीचे काम शनिवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. ते रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन मुळा धरणातून दुपारनंतर पाणी उपसा करण्यात आला. त्यामुळे उपनगरांना रविवारी होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दिवसाआड पाणीपुरवठ्यानुसार उपनगरांना गुरुवारी पाणीपुरवठा झाला होता. त्यानंतर शनिवारीही पाणी आले नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी पाणी न आल्याने उपनगरांतील नागरिकांची गैरसोय झाली.
...
सोमवारी या भागाला येणार पाणी
बोल्हेगाव, नागापूर, पाईपलाईन रोड, निर्मलनगर, मुकूंदनगर, स्टेशन रोड, केडगाव, नगर कल्याण रोड आदी भागात सोमवारी पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.