संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यातील प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चन्ने यांनी नगर येथे संवाद साधला. याप्रसंगी एसटीचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर, विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी दादासाहेब महाजन, कामगार अधिकारी सचिन भुजबळ, यंत्र अभियंता दिलीपराव जाधव, प्रदेश प्रवासी महासंघाचे सहसचिव बाबासाहेब भालेराव, तसेच नगर विभागातील सर्व आगारप्रमुख उपस्थित होते.
रणजीत श्रीगोड यांनी महामंडळाच्या इतिहासात प्रथमच प्रवासी संघटना प्रतिनिधींबरोबर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संवाद साधला गेल्याचे सांगितले. एसटी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर येथील एमआयडीसीमध्ये राज्यातील पहिली विभागीय एसटी कार्यशाळा सुरू केली. जिल्ह्यातील पाच आगार या कार्यशाळेला जोडले. तेथे अपघात झालेल्या बसच्या दुरुस्तीकरीता मोठी यंत्र उभारणी करावी, तसेच टायर रिमोल्डिंग कारखाना सुरू करावा, अशी मागणी श्रीगोड यांनी केली. सर्व आगारांना वाहक, चालक देऊन जादा बस सोडाव्यात, आर्थिक उत्पन्न वाढवावे, अधिकृत एसटी ढाब्यासंदर्भातील तक्रारी दूर कराव्यात, स्वच्छतेची व्यवस्था करावी, मुक्कामी ये-जा करणाऱ्या बस कोणत्याही स्थितीत बंद करू नयेत, कुरिअर सर्व्हिस सुरू करावी, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, आदी मुद्दे श्रीगोड यांनी यावेळी उपस्थित केले.
------