अकोले : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील नोकरभरती घोटाळ्यास जबाबदार असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाचे तातडीने निलंबन करावे, तसेच प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपसह तालुक्यातील पुरोगामी चळवळीतील संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी केली.याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, सहकारमंत्री, व सहकार आयुक्तांना सोमवारी सायंकाळी ई मेल द्वारे निवेदन पाठविले आहे.या प्रकरणातील खरे जबाबदार असलेले बँकेचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाचे त्वरित निलंबन होणे गरजेचे आहे. सरकारने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संचालक मंडळ बरखास्त करावे, याप्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. याची कसून चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.निवेदनावर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, शहराध्यक्ष धनंजय संत,ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश राक्षे, राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री विनय सावंत, समाजवादी कार्यकर्ते चंद्रभान भोत, माजी सभापती भाऊसाहेब नवले, विजय वाकचौरे, बाळासाहेब वाळुंज, मच्छिंद्र मंडलिक, प्रकाश कोरडे आदींच्या सह्या आहेत.
कारवाई न झाल्यास सहकारमंत्र्यांच्या दालनासमोर घंटानाद
भ्रष्टाचा-यांनी व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा रचलेला डाव ‘लोकमत’सारख्या वर्तमानपत्रांनी जागता पहारा देऊन उधळून लावला. जनतेच्या हिताचे रक्षण केले हे जागरूक पत्रकारितेचे द्योतक आहे. प्रशासकीय अधिका-यावर कारवाई बडगा उचलला जाणार असला तरी खरे दोषी बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ प्रथम बरखास्त करुन, त्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावेत, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. दोषींवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी सहकारमंत्र्यांच्या दालनासमोर घंटानाद आंदोलन छेडू असा इशारा समाजवादी कार्यकर्ते चंद्रभान भोत यांनी दिला आहे.