धामणगाव आवारी परिसरात बिबट्या ठोकतोय डरकाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:04+5:302021-02-24T04:22:04+5:30
धामणगाव आवारी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. गावाला लागून असलेले वनविभागाचे डोंगर, उसाच्या व इतर पिकांचा आश्रयाने हे बिबटे ...
धामणगाव आवारी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. गावाला लागून असलेले वनविभागाचे डोंगर, उसाच्या व इतर पिकांचा आश्रयाने हे बिबटे रात्री नागरी वस्तीकडे शिकारीसाठी येतात हे अनेकांनी पाहिले आहे. या परिसरात नेमके किती बिबटे आहेत हे जरी सांगता येत नसले तरी या परिसरात वेगवेगळ्या भागात रात्री थेट जनावरांच्या गोठ्यात घुसून बिबट्यांनी पाळीव प्राण्यांच्या शिकार करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. महिन्यांपूर्वी दोन बिबट्यांनी थेट येथील दौलत देशमुख यांच्या तब्बल पाच शेळ्यांच्या नरडीचा घोट घेत त्या ठार केल्या होत्या, तर नवनाथ दत्तात्रय आवारी यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने एक शेळी ठार, तर एक गंभीर जखमी केली होती. अशा अनेक घटना घडत असून, काही घटना समोरही येत नाहीत. अजूनही बिबट्याच्या पशुधनावरील हल्ल्याचे सावट सुरूच आहे.
या भागात बिबट्याकडून कुत्री, कोंबड्या, वासरे ठार होण्याच्या घटना आता नेहमीच्या झाल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या भागात वाढत चाललेल्या बिबट्यांच्या हल्ल्याबाबत वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शिकारीसाठी भटकणाऱ्या या बिबट्यांकडून भविष्यात लहान मुलांवरही हल्ले होऊ शकतात, अशी भीतीही आता नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
….…………..
पिंजऱ्याकडे फिरकेनात बिबटे
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली मात्र केवळ एका ठिकाणी पिंजराही लावण्यात आला. त्यात सावज म्हणून शिकारही ठेवण्यात आली, मात्र बिबट्या तिकडे फिरकतही नाही.
….……..
बिबट्यांची संख्या वाढतेय
बिबट्यांची संख्या वाढत चालली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे कमी पडत आहेत. त्यामुळे आता निदान प्रत्येक पशुधन पालकांना आपल्या पशुधनाचे रात्री संरक्षण करण्यासाठी शासकीय अनुदानस्तरावर भक्कम व बंदिस्त गोठ्यांसारखी उपाय योजना करता येईल का? याबाबत विचार व्हायला हवा तरच बिबट्याचा हल्ल्यात वारंवार होणारे पशुधनाचे नुकसान टळेल, अशा मागणीचा सूरही आता पशुधन पालकांकडून ऐकायला मिळत आहे.