दिली शिवी की फाड पाचशेची पावती; सौंदाळा गावात ठराव; शिवीगाळ करण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 10:02 AM2024-12-01T10:02:33+5:302024-12-01T10:02:52+5:30
सौंदाळा येथे गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत.
भेंडा (जि. अहिल्यानगर) : शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचा ठराव नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामसभेने केला आहे. महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सौंदाळा येथे गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत गावातील महिला व पुरुषांनी यापुढे शिव्या द्यायच्या नाहीत. शिव्या दिल्या तर दंड सक्तीने आकारण्यात येईल. आई व बहिणीचा कुठलाही दोष नसताना शिवीगाळ करून अर्वाच्च शब्द वापरून स्त्री देहाचा अपमान केला जातो. अशी भावना ग्रामस्थांनी मांडली. त्यानंतर सरपंच शरद आरगडे यांनी ठराव सूचना मांडली. त्याला गणेश आरगडे यांनी अनुमोदन दिले.
हे ठरावही झाले
सोशल मीडिया, मोबाइलमुळे शालेय विद्यार्थी अभ्यास करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे संध्याकाळी ७ ते ९ यावेळेत घरातील शालेय विद्यार्थ्यांकडे मोबाईल द्यायचा नाही, असाही ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
ग्रामसभेत बालकामगार बंदीचा ही ठराव घेण्यात आला. बालकामगार मुक्त गाव करण्यासाठी ‘बालकामगार दाखवा एक हजार रुपये मिळवा’ असे घोषवाक्य केले आहे. बालकामगार निदर्शनास आल्यास, त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतीकडे आणून द्यावा. त्या व्यक्तीस एक हजार रुपये बक्षीस देण्याचा निर्णय झाला. गावात बालविवाह शंभर टक्के बंद करण्यात आलेले आहेत. गावात कुणीही बालविवाह करू नये. तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही ठराव झाला.
आमच्या गावात शिवीगाळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे. दंडाची किमान रक्कम पाचशे रुपये आहे.
- शरद आरगडे, सरपंच ग्रामपंचायत सौंदाळा