लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : सिनेमा क्षेत्रातील कोणताही वारसा नसताना केवळ आवड, छंद जोपासली. प्रचंड मेहनत आणि अनुभवाच्या बळावर तालुक्यातील तांभोळ या खेड्यातील हातावर पोट असलेल्या कुटुंबातील तरुण मराठी सिनेमाचा दिग्दर्शक झाला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
‘हलगट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. पैशाच्या हव्यासापोटी बदलणारे मानवी रूप यात चित्रित करण्यात आले आहे.
तांभोळ या खेड्यातील गरीब कुटुंबातील करण सुमन अर्जुन (चव्हाण) हा युवक केवळ आवड व अनुभवाच्या जोरावर दिग्दर्शक झाला आहे. त्याने वर्तुळ व हलगट हे दोन मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. कूर्मकथा, गणवेश, राणू या चित्रपटांत सहदिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. गणवेश व वर्तुळ चित्रपटाचे चित्रीकरण अकोलेत झाले आहे.
लहानपणी करणला त्याचे आजोबा तमाशा पहायला घेवून जात. तमाशातील वगनाट्य त्याला भावले आणि कलाकार होण्याची स्वप्नं त्याला पडू लागली. दहावीनंतर शिक्षण घेण्यात तो रमला नाही. गरिबी पाचवीला पुजलेली. अशा परिस्थितीत त्याने विद्येचे माहेरघर पुणे शहर गाठले. तेथे तमाशा फडात बॅकस्टेजला पडेल ते काम केले. दादा पासलकरांच्या मंगल थेटर्स येथे नाट्यशिक्षणाचे धडे गिरवले. शिवाजीनगर बसस्थानक व रेल्वेस्टेशन येथे बुकस्टॉलवर राहून आपली निवासाची गरज भागविली.
...
ओळखीने बदलली नशिबाची दिशा
सिनेमात जायचे तर पुण्यापेक्षा मायावीनगरी मुंबई बरी हे लक्षात येताच तो मुबंईला आला. येथेही झोपायला रेल्वे प्लॅटफॉर्म आणि पांघरायला मायावी नगरीतील झगमगीत लाईट होती. येथे सिनेमा पोस्टर पब्लिसिटर रमेश शेट्ये यांची ओळख झाली आणि करणच्या नशिबाने दिशा घेतली. सुरुवातीला सहदिग्दर्शकाचा सहाय्यक म्हणून त्याने कामाला सुरुवात केली. मग आनंद चव्हाण यांच्यासोबत सहदिग्दर्शक म्हणून कूर्मकथा तर अतुल जगदाळे यांच्यासोबत अकोलेच्या मातीत गणवेश हे दोन मराठी सिनेमे त्याने केले.
...