दिव्यांगांना मिळाला हक्काचा पाच टक्के निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:20 AM2021-03-27T04:20:45+5:302021-03-27T04:20:45+5:30
बोधेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. याबाबत सावली दिव्यांग संघटनेने गटविकास ...
बोधेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. याबाबत सावली दिव्यांग संघटनेने गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सदरील निधीचे वाटप करण्याची मागणी केली होती. त्या आनुषंगाने पिंगेवाडी (ता.शेवगाव) येथील दिव्यांगांना गुरुवारी पाच टक्के निधी चेकद्वारे वाटप करण्यात आला.
राज्याचे दिव्यांग धोरण २०१८ नुसार चालू आर्थिक वर्षातील राखीव पाच टक्के निधी ३१ मार्च २०२१ अगोदर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी दिव्यांगांना वाटप करून दिव्यांग नोंदणी रजिस्टर अद्ययावत करण्याची मागणी २ फेब्रुवारी रोजी सावली दिव्यांग संघटनेने निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी निधी वाटप करण्याबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्र काढले. याची दखल घेऊन पिंगेवाडी ग्रामपंचायतीने गुरुवारी (दि.२५) गावातील १६ दिव्यांग बांधवांना चेकद्वारे प्रत्येकी चार हजार रुपयांच्या निधीचे वाटप केले. यावेळी सरपंच मंगल अण्णासाहेब जाधव, ग्रामसेवक सुनील राठोड आदींच्या हस्ते चेक वितरित करण्यात आले.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक अशोक तानवडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव नंदकिशोर मुंढे, उपसरपंच संगीता मच्छिंद्र जायभाये, सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख, मुस्लीम संघटना अध्यक्ष युसूफ शेख, अण्णासाहेब सोनाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य संजय तानवडे, अतीश अंगरख, उज्ज्वला मुंढे, रंजना तानवडे, परवीन शेख, फरीदा शेख, शैलेश गर्कळ, ग्रामपंचायत कर्मचारी रवी नागरे, रमेश अंगरख आदी उपस्थित होते.
-----
२६ पिंगेवाडी न्यूज
पिंगेवाडी येथील ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना राखीव पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच मंगल अण्णासाहेब जाधव, ग्रामसेवक सुनील राठोड व इतर.