अहमदनगर : राज्य शासनाच्या मोफत पुस्तक वाटप योजनेतून महापालिका शिक्षक मंडळाला पुस्तके प्राप्त झाली असून, गेल्या दोन महिन्यांत पुस्तकांचे वाटप झाले नाही. पुस्तके तत्काळ वाटप करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान, आठवडाभरात विद्यार्थ्यांना पुस्तके पोहोच करणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, कोविड महामारीच्या काळात शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. राज्य शासनाने मोफत पुस्तक योजना सुरू केलेली आहे. शासनाने पुस्तकेही पोहोच केलेली आहेत. परंतु, प्रशासनाकडून ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले नाहीत. पुढील दोन विद्यार्थ्यांना दोन दिवसांत पुस्तकांचे वाटप करावे, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंडळाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, तुकाराम कोतकर, लंकेश चितळकर, राहुल नेटके, तुषार जगताप, ऋषिकेश गवळी, ऋषिकेश ठोंबरे आदी उपस्थित होते.
...
फोटो: २७ एनसीपी