जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिविरबाबत शिर्डीला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:21 AM2021-04-22T04:21:07+5:302021-04-22T04:21:07+5:30
२० एप्रिल रोजी या विभागाने जवळपास ५०२ रेमडेसिविर इंजेक्शनचे जिल्ह्यात वाटप केले. यात पारनेर-२८, शेवगाव- १६, नेवासा-२२, श्रीरामपूर-४८, अहमदनगर-३१०, ...
२० एप्रिल रोजी या विभागाने जवळपास ५०२ रेमडेसिविर इंजेक्शनचे जिल्ह्यात वाटप केले. यात पारनेर-२८, शेवगाव- १६, नेवासा-२२, श्रीरामपूर-४८, अहमदनगर-३१०, कोपरगाव-१८ व संगमनेरसाठी ६० इंजेक्शन देण्यात आली.
गेल्या वीस दिवसांत शिर्डीतील कोविड रुग्णालयाला अवघे दोनशे रेमडेसिविर उपलब्ध झालेली आहेत. यात आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिलेल्या १०० इंजेक्शनचा समावेश आहे.
सध्या शिर्डीतील कोविड रुग्णालयात दीडशे रुग्ण ऑक्सिजनवर, तर पंधरा व्हेंटिलेटरवर आहेत. वेटिंगवरील अनेक रुग्ण कासावीस होत आहेत. साईबाबा संस्थानने ऑक्सिजन प्लॅन्ट असलेले आपले रुग्णालय कोविडमध्ये रूपांतरित केल्याने रुग्णांना किमान ऑक्सिजन तरी उपलब्ध होत आहे. मात्र, रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची केविलवाणी धडपड सुरू आहे.
.........
रिलायन्सची मदत
न्यायालयाने शिर्डीत ऑक्सिजन प्लांट व आरटीपीसीआर लॅब उभारणीसाठी परवानगी दिल्याने कोविड उपचारासाठी मोठा निर्णय झाला आहे. रिलायन्सच्या अंबानी परिवाराने या प्रोजेक्टच्या उभारणीसाठी मदत देऊ केली आहे. दोन्हीही कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, संस्थानचे प्रभारी सीईओ रवींद्र ठाकरे संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पीतांबरे, डॉ. सचिन बगाडे आदी या कामाच्या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत.
.............
तालुक्यातील खासगी व सरकारी कोविड सेंटरसाठी इंजेक्शनची मागणी केली आहे. किमान शिर्डी व प्रवरानगर येथील कोविड रुग्णालयातरी रेमडेसिविर द्या, अशी विनंती केली आहे.
-कुंदन हिरे, तहसीलदार
...................
हैदराबाद येथील एका कंपनीने साईसंस्थानच्या कोविड सेंटरला आठवड्याला दीडशे इंजेक्शन पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-रवींद्र ठाकरे, प्रभारी सीईओ, साईसंस्थान