अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी ६ मार्च रोजी संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्या सूचनेनुसार संचालकांना शुक्रवारी सायंकाळी सभेची विषय पत्रिका पाठविण्यात आली आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्य निवडीसाठी बँकेच्या स्व. मारुतराव घुले पाटील सभागृहात ६ मार्च रोजी दुपारी १ वाजता सभा होणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाची २१ मार्च रोजी निवडणूक पार पडली. निवडणुकीचे निकालपत्र विभागीय सहनिबंधकांना पाठविण्यात आले होते. विभागीय सहनिबंधक ज्योती लाठकर यांनी नवनिर्वाचित संचालकांची नावे असलेली अधिसूचना जारी केली. नवनिर्वाचित संचालकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली आहे. येत्या शनिवारी ही सभा होईल. सभेचे पीठासन अधिकारी म्हणून आहेर हे काम पाहतील. जिल्हा बँकेत २१ संचालक हे विविध मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनाच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो.
जिल्हा सहकारी बँकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बँकेचे १७ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. चार जागांसाठी निवडणुका झाल्या. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीनंतर जिल्ह्यातील साखर सम्राटांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक कोणते वळण घेते, याबाबत जिल्ह्याला उत्सुकता आहे.
....
इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांनी अधिकाधिक जागा बिनविरोध करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे एकमेकांच्या मदतीने १७ जागांच्या निवडी बिनविरोध झाल्या. महाविकास आघाडीने सर्वांच्या सहमतीने अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.