श्रीरामपूर : निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात कुणीही काहीही निरोप दिले तरी काँग्रेस उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाच मतदान करा. स्थानिक उमेदवार असल्याने कांबळे यांच्यासाठी गट-तट विसरून एकदिलाने काम करा, असे आवाहन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.श्रीरामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता शुक्रवारी शहरातील एका मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, केतन खोरे, याकूब बागवान, अकिल शेख, बंटी जहागीरदार, रईस जहागीरदार, तौफिक शेख, साजिद मिर्झा, कलीम कुरेशी, सुभाष राजुळे, कैलास बोर्डे, सुभाष आदिक, योगेश जाधव, निरंजन भोसले, सोहेल शेख, गुरुचरण भाटियानी आदी उपस्थित होते.थोरात म्हणाले, लोकांना जोडायचे व विधायक काम करायचे हा आपला स्वभाव आहे. तोडफोड करून राजकारण करणे कधीही केले नाही. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात तुम्हाला काहीही निरोप येतील, आदेश येतील मात्र ते मानायचे नाहीत. आमदार कांबळे हे काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहिलेले उमेदवार आहेत. त्यांचा कुणालाही त्रास नाही. स्थानिक उमेदवार असल्याने तालुक्याने त्यांना मोठे मताधिक्य मिळवून द्यावे.अविनाश आदिक म्हणाले, मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरला खासदार मिळण्याची संधी चालून आली आहे. ती आता कोणत्याही परिस्थितीत दवडायची नाही. येथील मतदारांची मानसिकता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे कांबळे यांचा विजय निश्चित आहे.याप्रसंगी अनुराधा आदिक, आमदार कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. थोरात हे श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी तळ ठोकून होते. त्यांनी उक्कलगाव, वडाळा महादेव, महांकाळवाडगाव, कारेगाव, बेलापूर आदी गावात सभा घेतल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सभापती सचिन गुजर यांच्या समवेत तसेच माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या आघाडीबरोबर थोरात यांनी वेगवेगळ्या गावांत सभा घेतल्या.
कुणाच्याही आदेशाला भीक घालू नका : बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:20 AM