कर्जत : सततच्या आजारपणाला कंटाळून मिरजगाव (ता. कर्जत) येथील तरुण डॉक्टरने स्वत:च्याच दवाखान्यात इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) रात्री घडली. चिठ्ठी लिहून त्यांनी आपल्या मृत्यूस इतर कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.
विश्वास अर्जुन कवळे (वय २९, रा. मिरजगाव, ता. कर्जत) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. अविवाहित असलेल्या डॉ. विश्वास कवळे यांनी वैद्यकीय शिक्षण (बीएएमएस) पूर्ण करून मिरजगाव येथील नूतन काॅलनीत गेल्या दोन वर्षांपासून बंगल्याच्या ग्राउंड फ्लोअरवर दवाखाना सुरू केला होता. गेल्या पंधरवड्यात त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही घेतले होते. त्या शिबिराला उत्तम प्रतिसादही मिळाला होता. त्यांची डेली प्रॅक्टिस उत्तमरीत्या सुरू होती. तरीही अचानक त्यांनी शुक्रवारी रात्री इंजेक्शन घेऊन जीवनयात्रा संपविली. रात्री उशिरा मुलगा झोपण्यासाठी का आला नाही हे पाहण्यासाठी आई-वडील दवाखान्यात गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. टेबलावर सुसाइड नोट ठेवलेली होती. त्यानंतर मित्र, नातेवाइकांनी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
----
पप्पा, ताई मला माफ करा...
आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे. हा निर्णय सर्वस्वी माझा असून यात मी कोणालाही दोषी मानत नाही. माझ्या मृत्यूला फक्त मीच जबाबदार आहे. ताई, पप्पा माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण मी जीवनाला कंटाळलो असल्याने हा माझा नाइलाज आहे. माझ्यानंतर संपत्तीची वाटणी करताना घर अनितादीदीला व जमीन वृषालीदीदीला द्यावी. अनू व बंटीला विनंती आहे की त्यांनी पप्पा व ताईची काळजी घ्यावी. पप्पा व ताई एकमेकांची काळजी घ्या. मी इंजेक्शन घेऊन मरत आहे. माझे अंत्यसंस्कार पिंपळगावला करावे. मी सर्वांची माफी मागतो. पप्पा, ताई, अनु, गणेश दाजी, बंटी व रवी दाजी मला माफ करा. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, असे डॉ. विश्वास कवळे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
---
३१ विश्वास कवळे